आमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा दान  - Plasma donated by MLA Rahul Kul | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा दान 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ससून रूग्णालयात प्लाझ्मा दान केले आहे.

केडगाव : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणा करीत आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ससून रूग्णालयात प्लाझ्मा दान केले आहे. कुल हे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर डॅाक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी प्लाझ्मा दान केले आहे.

आमदार कुल यांना चार जुलैला कोरोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले होते. या दरम्यान ऑक्सीजन बेडचा तुटवडा होता. त्यामुळे कुल यांनी रूग्णालयात दाखल होऊन तेथील बेड अडविण्यापेक्षा पुण्यातील सदनिकेत राहणे पसंत केले. सदनिकेत २० दिवस एकटे राहून त्यांनी औषधे घेत व  व्यायाम, प्राणायाम करत कोरोनाला हरविले. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कुल यांनी पुण्यातील डॅाक्टरांशी संपर्कात राहत घरीच उपचार घेतले. कोरोनावरील उपचार घेत असतानाही त्यांनी नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध करून देत त्याद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडविले. 

कुल म्हणाले, "प्लाझ्माचा तुटवडा राज्यभर जाणवत असल्याने हे दान केले आहे. राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरता मर्यादित असणारा कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. परंतु रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मा दान करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे. प्लाझ्मा दात्यांचा तुटवडा जाणवत असल्याने मी प्लाझ्मा दान केले आहे. एकमेकांच्या साथीनेच आपण या संकटावर मात करू शकतो. कोरोना विरुद्धचा लढाईला अधिक बळकटी मिळावी, यासाठी प्रत्येक कोरोनामुक्त नागरिकाने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन कुल यांनी केले आहे.  

कोरोनाच्या बाबतीत रविवारी (काल) पुणेकरांना दिलासा देणारी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात काल पहिल्यांदाच नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात काल (ता.२७) दिवसभरात एकूण ३ हजार ३१३ नवे  कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट तब्बल ३ हजार ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

यामुळे काल नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५८१ ने अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख २८ हजार ४७६ झाली आहे. 

कालच्या एकूण नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५४८ जण आहेत. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६६०, नगरपालिका क्षेत्रात २०८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ८५ नवे रुग्ण सापडले आहेत.

 दरम्यान, काल ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८ आणि  नगरपालिका क्षेत्रातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही शनिवारी (ता. २६) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता. २७) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५९९, पिंपरी चिंचवडमधील ९१४, , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार १६२,  नगरपालिका क्षेत्रातील २०१आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील १८ जण आहेत. दरम्यान, आतापर्यंत ६ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याच्या बाहेरील २३९ जण आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख