मुंबई : वीज बिलामुळे सध्या राजकारण तापलं आहे. राज्य सरकारला या विषयावरून विरोधकांनी धारेवर धरले आहे. भाजपचे नेते सरकारवर टीका करीत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वीज बिलावरून राज्य सरकार व नाव न घेता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणे यांनी टि्वटवरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये राणे म्हणतात, "या महाविकास आघाडी सरकारने "NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे, असं दिसते..वीज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..आणि मग..Penguin Gang ची पार्टी सुरु"
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. "महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना घोषणा करायला सांगतात आणि ऐन वेळेवर ‘हात वर’ करतात. त्यामुळे राज्यातील जनतेसमोर ऊर्जामंत्री तोंडघशी पडत आहेत. महाराष्ट्र सरकार चळवळीतून वर आलेल्या डॉ. नितीन राऊत यांना बदनाम करीत आहे," असा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.
या महाविकास आघाडी सरकारने "NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते..
विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..
आणि मग..
Penguin Gang ची पार्टी सुरु!!!— nitesh rane (@NiteshNRane) November 19, 2020
बावनकुळे म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनात आणले तर ऊर्जा खात्याचे सर्व प्रश्न एका मिनिटात, चुटकीसरशी सुटू शकतात. पण त्यांना तसे करायचे नाहीये. त्यांना कॉंग्रेसच्या मंत्र्यांना बदनाम करायचे आहे. म्हणूनच हा खेळ त्यांनी चालविला आहे. पण या खेळात राज्यातील जनतेचे हाल होत आहेत, हे त्यांना विसरू नये. डॉ. नितीन राऊत चळवळीतून वर आलेले नेतृत्व आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांना आता अशा सरकारमध्ये राहू नये आणि बदनाम होऊ नये. सरकारच्या बोलण्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. जनतेचाच काय ? सरकारमधील मंत्र्यांचाही एकमेकांवर विश्वास नाही. त्यामुळे सरकार नीट चालत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे, पूरग्रस्तांचे सर्वांचेच हाल होत आहेत. याच सरकारने सुरुवातीला १०० युनिट वीज बिल माफ करण्याचा शब्द दिला होता, तो पाळला नाही. दिलेले एकही वचन या सरकारने पाळले नाही. उलट आता ९५ लाख लोकांची वीज कापायला निघाले आहेत. ९५ लाख लोकांची वीज कापल्यावर त्याचा परिणाम थेट पाच कोटी जनतेवर होणार आहे. येवढे मोठे पाप हे सरकार कोठे फेडणार आहे? असा प्रश्न करून आपल्याच सरकारमध्ये ऊर्जामंत्री हतबल झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले.

