राजकारणातील निःस्पृहपणा काय असतो, हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले  - Patriot Abasaheb Veer Social Award presented to Ganapatrao Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणातील निःस्पृहपणा काय असतो, हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

एका आबासाहेबांच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या आबासाहेबांना देताना मनस्वी आनंद होत आहे.

भुईंज (जि. सातारा) : "एका आबासाहेबांच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या आबासाहेबांना देताना मनस्वी आनंद होत आहे. "पुलोद' सरकारमध्ये भाई गणपतराव देशमुख आणि प्रतापराव भोसले यांनी एकत्र काम केले. त्या वेळी 40 वर्षांपूर्वी प्रथमच त्यांची भेट झाली. आयुष्यभर विरोधी पक्षात राहूनही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वत:चा दरारा आणि आदरयुक्त भीती निर्माण करण्याचे काम केले. निःस्पृहपणा काय असतो, हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून दाखवून दिले,''असे किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी सांगितले. 

भुईंज (ता. वाई, जि. सातारा) येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देशभक्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार गणपतराव देशमुख व रतनबाई देशमुख यांना कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आला. शाल, पुष्पहार, श्रीफळ, सन्मानपत्र व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनताई देशमुख यांचाही साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. 

भोसले म्हणाले, गेल्या 24 वर्षांपासून हा सामाजिक पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्कारासाठी अभ्यास समिती नेमून निवड केली जाते. देशमुख यांनी आपल्या जीवनात शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेसाठी काम उभे केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे. संसदीय कार्य प्रणालीमध्ये त्यांनी राजकारणामध्ये नव्याने येणाऱ्या तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. देशमुखांना पुरस्कार प्रदान करताना मनस्वी आनंद वाटत आहे. 

पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख म्हणाले, क्रांतिवीर किसन वीर यांच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील योगदानाची जाणीव मनात सदैव आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. वास्तविक पुरस्कार स्वीकारणे मी थांबवले होते. मात्र, मदन भोसले यांनी आवर्जून या पुरस्कारासाठी निवड केली आणि आबासाहेब वीर यांच्या नावाचा हा पुरस्कार असल्याने तो आपण नम्रतेने स्वीकारत असून, जनतेला अर्पण करीत आहे. 

ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या प्रगतीच्या चळवळीत किसन वीर यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र प्राप्तीसाठी झगडलेल्या किसन वीर यांनी येरवड्याचा तुरुंग फोडला. त्या वेळी त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने मोठे बक्षीस ठेवले; पण ते अखेरपर्यंत त्यांच्या हाती लागले नाहीत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार, शिक्षण, राजकारण या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. किसन वीर यांचे नाव अजरामर राहावे, यासाठी मदन भोसले यांनी या परिस्थितीतही सांगोला येथे येऊन पुरस्कार प्रदान केला. त्यांची ही कृती कृतज्ञता कशी व्यक्त करावी, याचे उदाहरण असून, ते आता दुर्मीळ मानावे लागेल.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख