चार विद्यमान आमदारांसह दोन माजी आमदार, माजी खासदार रिंगणात - Parbhani District Bank Two former MLA and one former MP are in the fray along with four existing MLA | Politics Marathi News - Sarkarnama

चार विद्यमान आमदारांसह दोन माजी आमदार, माजी खासदार रिंगणात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 15 जागेसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत.

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक सर्वांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार यात तिळमात्र शंका नाही. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील चार विद्यमान आमदार, दोन माजी आमदार व एक माजी खासदार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ही निवडणुक परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरत आहे. कारण या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकारण्यानी उडी घेतलेली आहे.

बॅंकेच्या 21 संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी यापू्र्वी बिनविरोध निवड झालेल्या सहा संचालकामध्ये चार बोर्डीकर गटाचे तर दोन वरपुडकर गटाचे आहेत. त्यात बोर्डीकर गटाचे स्वतः माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, बालासाहेब देसाई (पूर्णा), आमदार तानाजी मुटकुळे (हिंगोली), भगवान सानप (गंगाखेड) तर वरपुडकर गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट यांचा समावेश आहे. हे सहाही जण सोसायटी मतदार संघातून बिनविरोध झाले निवडून आले आहेत. त्यामुळे आता 15 जागासाठी चुरस होणार आहे. या 15 जागेसाठी तब्बल 33 उमेदवार रिंगणात आहेत. या 33 जणांमध्येही सर्वच उमेदवार मात्तबर व जुने राजकारणी आहेत.

 
चार विद्यमान आमदार निवडणुक रिंगणात
या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील चार विद्यमान आमदार ज्यात भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर (जिंतूर), कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर (पाथरी), राष्ट्वादी कॉग्रेसचे आमदार राजू नवघरे (वसमत) व भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (हिंगोली) यांचा समावेश आहे. तर भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर (भाजप) व माजी आमदार सुरेश देशमुख (कॉग्रेस) यांचाही निवडणुकीत समावेश आहे. हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने हे देखील संचालकपदासाठी निवडणुक लढवित आहेत.

21 मार्चला मतदान ; 23 मार्च ला मतमोजणी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीचे मतदान ता. 21 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 5 या वेळेत होणार आहे. तर मतमोजणी ता. 23 मार्च रोजी सकाळी 8 पासून सुरु होईल. याच दिवशी मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख