`बैठकीतून आम्ही अधुनमधुन उठलो...पण पवार साहेब 12 ते सहा ठाण मांडून होेते` - Pankja Munde apprises sharda pawar due to these reasons | Politics Marathi News - Sarkarnama

`बैठकीतून आम्ही अधुनमधुन उठलो...पण पवार साहेब 12 ते सहा ठाण मांडून होेते`

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

पवारांचा उल्लेख करू नये, हा तर नियम नाही ना, असा सवाल पंकजा यांनी केला. 

पुणे : ऊसतोडणी मजुरांच्या वेतनवाढप्रश्नी झालेल्या बैठकीत शरद पवार हे सलग आठ तास बसून होते. एखाद्या नेत्याची कार्यक्षमता आणि कामाबद्दल आदर व्यक्त केला तर काय चुकले? आम्ही त्यांच्या निम्म्या वयाचे असतानाही अधुनमधुन उठत होतो.  कोणी पाणी प्यायला किंवा अन्य कारणांसाठी जागेवरून उठले असताना पवार साहेबांची ही कार्यशैली आवडल्याचे मत व्यक्त करणे म्हणजे महाराष्ट्राच्या खेळीमेळीच्या राजकारणाचे ते प्रतिक आहे,  अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केल्यामागची कारणे सांगितली.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. शरद  पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार तुमच्या बोलण्यात येतात, या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की साखर कारखानादारीचा आणि त्यांचा प्रश्नांचा सर्वाधिक अभ्यास आणि अनुभव हा शरद पवारांचा आहे. त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय या क्षेत्रात कोणी निर्णय़ घेऊ शकत नाही. एक टप्पा असा आला होता की या प्रश्नी आम्हाला वारंवार बोलावे लागत होते. साखर उद्योगांच्या प्रश्नांविषयी पवारांना, नितीन गडकरींना आम्ही भेटतच असतो. पण पवारांचा उल्लेख करू नये, असा नियम तर नाही ना, असा प्रतिसवाल त्यांनी केला.  समजा मी त्यांचे कौतुक केले तर ते माझ्याविरुद्ध राष्ट्रवादीचा उमेदवार देणार नाहीत का? आपण सतत राजकारणच केले पाहिजे का, अशी विचारणा त्यांनी केली.  

ऊसतोडणी मजुरांमध्ये तुम्हाला पर्याय नेतृत्त्व तयार करण्याचे प्रयत्न झाले का याबाबत त्या म्हणाल्या, ``एवढ्या लोकांना वंचित घटकाचा कळवळा आहे, हे पाहून बरे वाटले. सुरेश धस यांनी पक्षाकडे या प्रश्नी मेळावे घेण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षाने त्यांनी परवानगी दिली. त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही.`` 

ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाला पक्षीय स्वरूप येऊ द्यायचे नव्हते. 99 टक्के कारखाने हे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे होते. एका पक्षाचे कारखाने आणि एका पक्षाचे कामगार असे पक्षीय  स्वरूप या प्रश्नाला मी दिले तर अडचणीचे होईल. त्यामुळे शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांनी अतिशय परिपक्वपणे निर्णय घेतले. तीच लवादाची परंपरा पुढे मी पुढे चालवली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख