पंकजा मुंडे नाराज नाहीत, कशाला त्यांच्या नाराजीच्या बातम्या चालवता.. - Pankaja Munde is not upset, why are you spreading the news of his displeasure | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे नाराज नाहीत, कशाला त्यांच्या नाराजीच्या बातम्या चालवता..

जगदीश पानसरे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

तुमच्याकडे बातम्या नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्या सप्लाय करू, पण इथून पुढे पंकजा मुंडे नाराज,अशा बातम्या चालवू नका, असा चिमटा फडणवीस यांनी यावेळी काढला.

 

औरंगाबाद ः तुमच्याकडे बातम्या नसल्या की तुम्ही पंकजा मुंडे नाराज असल्याचा बातम्या चालवता. तुमच्याकडे बातम्या नसतील तर आम्ही पुरवू, पण पंकजा नाराज अशा बातम्या यापुढे चालवू नका, पंकजा मुंडे नाराज नाहीत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितले. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतच फडणवीस यांनी पंकजा मुंडेच्या नाराजी बद्दल स्पष्टीकरण दिले.

भाजपच्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्याच बातम्या राजकारणात नव्या नाहीत. अगदी परळी विधानसभेतील पराभवापासून ते आताच्या मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी पर्यंतच्या प्रवासात पंकजा मुंडे नाराज आहेत, अशा अनेक बातम्या प्रसिध्द झाल्या. पंकजा यांचे कट्टर समर्थक व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केलेल्या बंडखोरीचा संबंध देखील पंकजा यांच्या नाराजीशी जोडला जातो.

औरंगाबादेत पत्रकार परिषदेत फडणवीस यांना हा प्रश्न वारंवार विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी देखील मजेदार उत्तर देत या बातम्यांचे खापर प्रसारमाध्यामांवरच फोडले. फडणवीस म्हणाले, तुम्हाला बातम्या नसता तेव्हा तुम्ही पकंजा मुुंडे नाराज असल्याच्या बातम्या चालवता. बोराळकर हे गोपीनाथ मुंडे यांचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी मुंडे साहेंबानीच त्यांना उमेदवारी दिली होती, पंकजा देखील त्याच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे बोराळकरांना त्यांचा विरोध किंवा नाराजी कशी असेल? तुमच्याकडे बातम्या नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्या सप्लाय करू, पण इथून पुढे पंकजा मुंडे नाराज,अशा बातम्या चालवू नका, असा चिमटा फडणवीस यांनी यावेळी काढला.

जयसिंगराव जिथे जातात तिथे अस्वस्थ होतात..

भाजपचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील भाजपवर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या संदर्भात बोलतांना फडणवीस म्हणाले, जयसिंगराव आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते होते. ते आधी भाजपमध्ये होते, त्यांना अस्वस्थता जाणावयला लागले म्हणूुन राष्ट्रवादीत गेले, तिथे अस्वस्थ वाटायला लागले म्हणून पुन्हा भाजपमध्ये आले, आणि आता पुन्हा त्याच कारणाने राष्ट्रवादीत जातायेत. जिथे जातील तिथे त्यांना अस्वस्थ वाटते, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख