पुरंदर विमानतळ जागेस विरोध, प्रकल्पास नव्हे..आमदार जगतापांचा पुनरुच्चार  - Opposition to the Purandar airport site, not the project  MLA Sanjay Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

पुरंदर विमानतळ जागेस विरोध, प्रकल्पास नव्हे..आमदार जगतापांचा पुनरुच्चार 

सुनील मेमाणे
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

"पुरंदर  विमानतळाच्या जागेस विरोध आहे. विमानतळाच्या प्रकल्पास नव्हे.'' असा पुनरुच्चार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केला आहे.

पारगाव मेमाणे (पुणे) : "पुरंदर मधील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेस विरोध आहे. विमानतळाच्या प्रकल्पास नव्हे.'' असा पुनरुच्चार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केला आहे.

आमदारकीच्या कारकीर्दीची वर्षपूर्ती निमित्त 'सरकारनामा विशेष'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कोणतीही तांत्रिक अडचण नसलेली, भूसंपादन सोपे, अशी सुयोग्य पर्यायी जागा विमानतळासाठी सुचवली असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना भेटलो आहे, असे आमदार जगताप म्हणाले. 

पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष अनिश्चिततेमुळे चर्चेचा विषय बनला आहे. पुणे शहराच्या उत्तरेला सुमारे 35 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेस 27 फेब्रुवारी 2009 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, नदीपात्रात करावा लागणारा बदल, टेकड्या, डोंगररांगा सपाटीकरण, बागायती क्षेत्र व पुनर्वसन इत्यादी तांत्रिक अडचणी सांगत हा प्रकल्प पुरंदर तालुक्यात हलविण्यात आला. 

2016 मध्ये पाहणी करण्यात आलेल्या कुंभारवळण, पारगाव मेमाणे, राजेवाडी, नायगाव कोळविहिरे, नावळी, या सहा जागांपैकी पारगाव मेमाणे- मुंजवडी ह्या जागेला विमानतळासाठी पसंती देण्यात आली होती. मात्र 'आम्हाला पैसे नकोत आमच्या जमिनी राहू द्या' असे सांगत विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून सात गावातील भूमिपुत्रांनी केलेला कडक विरोध; विमानतळाच्या भूसंपादनातील प्रमुख अडसर आहे. 

'विमानतळाच्या प्रकल्पाला  विरोध आहे असे म्हणणे चुकीचे असून विमानतळाच्या जागेस माझा विरोध आहे. मी सुचविलेली पर्यायी जागा सुयोग्य व भूसंपादनास सोपी आहे. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. तीच्या सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणास दिले आहेत. सरकारने निर्णय घेतल्यास केवळ चार ते सहा महिन्यात तेथील भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया होऊ शकते, असे मत आमदार संजय जगताप यांनी यावेळी मांडले. 

शेततळी व पुरंदर उपसाच्या पाण्याचे नियोजन करून जमिनी बागायती केल्या आहेत. त्या विमानतळास देण्यास आमचा विरोध आहे. आमची मातृभूमी आम्ही राखणारच पैशाची भाषा येथे कुणी करू नये.

सर्जेराव मेमाणे, सरपंच पारगाव मेमाणे.

हेही वाचा : स्वतःला इंजिनीअर म्हणवणाऱ्या शिवतारेंना अभ्यासाची गरज

सासवड : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या काळात आखलेली गुंजवणी धरणाची बंद पाईप सिंचन योजना ही 90 टक्के बागायती गावांनाच पाणी देणारी आहे. केवळ दहा टक्केच जिरायती गावे लाभार्थी ठरतील. केवळ काॅन्ट्रॅक्टरधार्जीनी योजना आखली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्या योजना फेल आहे. त्यामुळे शिवतारे स्वतःला इंजिनीअर म्हणवतात.. त्याचा व योजनेचाही अभ्यास करण्याची गरज आहे, असा टोला पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी शिवतारे यांचे नाव घेऊन लगावला. गुंजवणी प्रकल्पाबाबत आमदार जगताप म्हणाले, "खरे तर शिवतारे यांचे मला खुपच आश्चर्य वाटते. मी काॅमर्सचा पदवीधर विद्यार्थी, एमबीए केले. पण शिवतारे स्वतःला इंजिनीअर आहे, असे म्हणवतात. पण आम्ही गुंजवणी प्रकल्पाबाबत तांत्रिकृष्ट्या जो प्रस्ताव मांडला, कसा योग्य व त्यांचा आधीचा आराखडा तांत्रिकदृष्ट्या कसा योग्य नाही., हे आम्ही मांडले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख