वरूण सरदेसाई यांचे WHATS APP कॉल, CDR रिपोर्ट तपासा... - nitesh rane slams cm udhhav thackeray over sachin vaze case and expose betting-case | Politics Marathi News - Sarkarnama

वरूण सरदेसाई यांचे WHATS APP कॉल, CDR रिपोर्ट तपासा...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांचा सीडीआर रिपोर्ट तपासणीचे मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज `वर्षा` बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत सचिन वाझे यांच्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीमंडळात काही फेरबदल करण्याबाबतही महत्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. शरद पवार आणि नाना पटोले यांनी मुख्यमत्र्यांची भेट घेतली आहे, भाजपचे नेते नितेश राणे यांनी  या भेटीवरून तसेच सचिन वाझे प्रकरणावरून आघाडी सरकारवर टीका केली आहे. सचिन वाझेंना वाचविण्यामागे ठाकरे सरकारला वरूण सरदेसाई यांना वाचवायचं आहे का, असा सवाल राणे यांनी केला आहे.
 
युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांचा सीडीआर रिपोर्ट तपासणीचे मागणी नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे बुधवारपासून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिला नाही, अभिनेता आमिर खानसोबत मुख्यमंत्री जेवण करतात, मात्र शरद पवार यांना ते वेळ देत नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.  

दिल्लीत अधिवेशन सुरू असताना देखील शरद पवार मुंबईत आहेत. मंत्र्यांची बैठक असल्यामुळे गंभीर काहीतरी सुरू आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे त्यांना कोव्हीड काळात का आणले गेले. सचिन वाझे हे काय WHO चे सदस्य आहेत का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.  वरूण सरदेसाई याचे WHATS APP कॉल, CDR रिपोर्ट तपासा. हे जर तपासलं नाही तर वाझेचा गॉड फादर कोण? हे कळणार नाही.  सचिन वाझेंना स्पेशल ट्रिटमेंट का मिळत होती ? वरूण सरदेसाई यांची चौकशी झाली पाहिजे.  वरूण सरदेसाई सीडीआर रिपोर्ट बाहेर काढला पाहिजे. वाझे आणि शिवसेनेतील एका नेत्याचा 'टेलीग्राम चाट' आहे. हा नेता उपनगरातील आहे, असा गैाप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी सचिन वाझेंवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझेंनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. 

नितेश राणे यांनी आज भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहित आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत. वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणेंनी केली आहे. वाझे-वरुण सरदेसाईंची काय लिंक आहे त्याचाही तपास करण्यात यावा, सर्वच बाहेर येईल. यामागचा बोलविता धनी कोण आहे ? याचीही चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत ही चौकशी होत नाही, तोपर्यंत वाझेचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा मायबाप कोण ? आणि गॉडफादर कोण हे सुद्धा बाहेर येईल, असंही ते म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख