आमदार रोहित पवारांच्या विधानावर निलेश राणेंचे प्रत्युत्तर.. - Nilesh Rane  on Rohit Pawar’s criticism of Chandrakant Patil   | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवारांच्या विधानावर निलेश राणेंचे प्रत्युत्तर..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार समाचार घेतला जात आहे.

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार समाचार घेतला जात आहे. पुण्यातील एका मेळाव्यात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली होती. 

आमदार रोहित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांना सचिन तेंडुलकरची बॅटिंग आणि त्यावरील मित्राची प्रतिक्रिया याचं एक उदाहरण देत चिमटा काढला होता. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांना ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. 

निलेश राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की सचिनची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. सचिन आऊट जरी झाला तरी देशाला त्याच्यावरती विश्वास होता की जे काही करेल ते सचिनच करेल, देशाचं सोडा पण महाराष्ट्र मध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही. साखर कारखान्यांच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र दिसत नाही त्यांनी बोलू नये. 

“सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणाचा मित्र ओरडायचा… अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही!, पवारसाहेबांबाबत चंद्रकांत दादांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,” असं ट्वीट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली होती.  

चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव करत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं, “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख