निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ‘स्कॅनिंग’... - NCP's 'scanning' before elections  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ‘स्कॅनिंग’...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात मोहिम उघडली आहे. 

 अकोला: पुढील वर्षी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूक आणि त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेचे ‘स्कॅनिंग’ होणार आहे. त्यासाठी पक्ष निरीक्षकांना निर्देश देवून त्यांना सूचनांची यादी सोपविण्यात आली आहे. या ‘स्कॅनिंग’चा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर होणार आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात मोहिम उघडली आहे. नुकताच त्यांनी राज्यभर जिल्हानिहाय आढावा दौराही केला. या दौऱ्यातून त्यांच्यापुढे आलेले चित्र नक्कीच सुखावणारे नव्हते. 

त्यामुळे त्यांनी आता थेट पक्षनिरीक्षकांनाच पक्ष संघटनेच्या रचनेवर कार्य करण्यासाठी नियुक्त केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून याकडे बघितले जात आहे. त्यासाठी शहर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करणे, जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकी घेवून पक्ष संघटना बळकट व मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्ष संघटनेची रचना लक्षात घेवून नियोजन करण्याचे निर्देश जयंत पाटील यांनी दिले आहे. 

सोबतच पक्षाचे जिल्हा निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बुथ कमिटी व गाव कमिटी यांच्या कार्यप्रणालीबाबतच्या सूचनांचा संचच शहर जिल्हा निरक्षकांकडे सोपविला आहे. त्यानुसार कार्यवाही करून कार्यवाहीचा अहवाल प्रदेशाध्यक्षांच्या नावे सादर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. दरम्यान, अकोला व चंद्रपूर शहर जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून नागपूर जिह्यातील प्रवीण कुंटे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ मार्च रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. यापूर्वी कुंटे पाटील यांनी अकोला जिल्हा निरीक्षक म्हणूनही काम बघितले आहे. त्यामुळे अकोला शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेचा कारभार त्यांनी जवळून अनुभवलेला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख