पिंपरी : "झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही," असा हल्लाबोल शिरूरचे (जि. पुणे) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकरी आंदोलनावर तेरा दिवसांनीही निर्णय न घेतलेल्या केंद्र सरकारवर भोसरीमध्ये काल केला.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील तीन कोटी रुपयांच्या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि कोल्हेंच्या प्रयत्नातून हा उपक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या उपक्रमाची खरी गरज ही शेतकरी आंदोलनाची दखल न घेणाऱ्या बहिऱ्या झालेल्या केंद्र सरकारसाठी दिल्लीत आहे, असा टोमणा शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी लगावला होता. सरकारची भूमिका ऐकण्याची पाहिजे, असे ते म्हणाले होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आदिवासींच्या प्रश्नांवर तोडगा काढू! #sarkarnama #sarkarnamnews @CMOMaharashtra https://t.co/oGfM7iiRDz
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 10, 2020
हलक्या कानाच्या नेत्यांसाठी अशी शिबिरे ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनासाठी चीन व पाकिस्तानमधून रसद पुरवठा होत असून त्यात भाड्याने माणसे असल्याचा बेलगाम आरोप पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी नुकताच पालिका सभेत केला होता. पवार व घोळवेंचे हे दोन संदर्भ पकडून श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम योग्यवेळी व योग्य ठिकाणीही होत असल्याचा टोला कोल्हे यांनी लगावला.
निवडून येणं सोपं असतं, पण त्यानंतर काम करणं हे अवघड असतं, असे जयंत पाटील म्हणाले. विधानसभेचे यश व राज्यात मिळालेली सत्ता याच्यात कोल्हेंचा मोठा वाटा आहे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंनी पायाला भिंगरी लावून विधानसभेला केलेल्या प्रचाराचे कौतूक करीत त्याची पोचपावती दिली. बंद पडलेल्या बैलगाडा शर्यतीचाही प्रश्न ते सोडवतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू
मुंबई : 'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेचे केले आहे. दानवे यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे दानवेंच्या विधानावर संतापले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अशा वातावरणात शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असं म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दानवे हे मूळचे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे याची सर्वात आधी डीएनए चाचणी करावी लागेल, पुन्हा असे वक्त्यव्य त्यांनी करू नये. या आधी दानवे यांच्या घरावर आम्ही गेलो होतो, आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल का, असे बच्चू कडू म्हणाले.

