जयंतरावांनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटील हे राजू शेट्टींचे टार्गेट - NCP minister Balasaheb Patil is Raju Shetty target FRP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

जयंतरावांनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री बाळासाहेब पाटील हे राजू शेट्टींचे टार्गेट

संभाजी थोरात
शुक्रवार, 12 मार्च 2021

राजू शेट्टी यांनी एफ.आर.पीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे साखर कारखाने टार्गेट केले आहेत.

कराड : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेसाठी नाव आघाडीवर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एफ.आर.पीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे साखर कारखाने टार्गेट केले आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर आता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर 22 मार्चला ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. 

यावर्षी एकरकमी एफआरपी देण्यात येईल, असं आश्वासन साखर कारखान्यांनी गळीत हंगामाच्या सुरवातीला दिलं होते, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने आणि सांगली जिल्ह्यातील तीन कारखाने वगळता कुणीही हे आश्वासन पाळले नाही, त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा कारखान्यांमध्ये खुद्द सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सत्ता असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. 

आता राजू शेट्टी स्वतः या कारखान्यावर असलेल्या माजी आमदार पी.डी.पाटील यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राजू शेट्टी असा सामना पहायला मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये असली तरीही लोकांच्या प्रश्नासाठी कायम लढत राहणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा घटकपक्ष आहे. तरीही काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारविरोधात भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार व संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई सुरू केल्याने संघटनेच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. घटकपक्षांनी थेटपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडी स्थापना झाल्यानंतर काही अन्य पक्षही या आघाडीत सहभागी झाले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, शेकाप, लोकभारती व रिपाइं कवाडे गटाचा समावेश आहे. पहिल्या दिवसापासून हे घटकपक्ष आघाडी सरकारवर नाराज आहेत. अनेक महत्वाच्या विषयात या घटकपक्षांना गृहित धरण्यात येते. त्यामुळे स्वाभिमानी सारखे पक्ष सरकराच्या विरोधात रस्त्यावर आले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख