खडसे म्हणाले, "मला मंत्रीपदावरून का काढलं, हे ते अजूनही सांगू शकले नाही.." - NCP leader Khadse said He still could not explain why he was removed from the ministry  | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे म्हणाले, "मला मंत्रीपदावरून का काढलं, हे ते अजूनही सांगू शकले नाही.."

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

नाथाभाऊंना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी त्याच्या घराजवळ कार्यकर्त्यांची एकच रिघ लागली होती.

जळगाव : "पदं येतील आणि जातील. पण झालेला अपमान भरून काढता येणार नाही, मला मंत्रिदावरून का काढलं हे ते अजूनही सांगू शकले नाही," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.  राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच मुक्ताईनगर येथे आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  मुक्ताईनगरात खडसेंचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मुक्ताईनगरात पोहोचले. त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे औक्षण केले. 

कार्यकर्त्यांनी केलेली गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, "नाथाभाऊ जिंदाबाद" अशा वातावरणात ते घराकडे मागर्स्थ झाले. नाथाभाऊंना गुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी त्याच्या घराजवळ कार्यकर्त्यांची एकच रिघ लागली होती.

मुक्ताईनगर येथे आल्यावर खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. माझा भाजपला विरोध नव्हता. भाजपमधील वाईट प्रवृत्तींविरोधात मी लढा दिला. एका व्यक्तिमुळे आपलं नुकसान झालं असं सांगतानाच फडणवीस यांची प्रवृत्ती 'हम करे सो कायदा' अशीच असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली.

एकनाथ खडसे म्हणाले की भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी ही कार्यकर्त्यांची भावना होती. मी भाजपला सोडल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्याचाच उत्सव आज दिसत आहे. आज खऱ्या अर्थाने माझं सीमोल्लंघन झालं आहे, असं सांगतानाच माझा भाजपला विरोध नाही. भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला. मला मंत्रिदावरून का काढलं हे ते अजूनही सांगू शकले नाही. कारण काय होतं ते त्यांना सांगता आलं नाही, असं सांगतानाच पदं येतील आणि जातील. पण झालेला अपमान भरून काढता येणार नाही, असंही ते म्हणाले. 

एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला नाथाभाउंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे, अशी प्रतिक्रिया खडसे यांच्या भाजप राजीनाम्यानंतर रक्षा खडसे यांनी व्यक्त केली होती. ''मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करणार आहे,'' असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ  खडसे यांनी येथे केले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा आज आपला पहिला दिवस आहे.आज दसऱ्याचे सीमोल्लंघन आहे. या दिवशी रामाने रावणाचा नाश केला  होता. अन्यायाचे निर्दालन केले होते. त्यामळे आज महत्वाचा दिवस आहे. समाजात असलेल्या घटनाबाह्य, अन्याय कारक बाबींचे आपणास निर्दालन करावयाचे आहे.आपण सर्वांनी एकत्र कार्य करून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकाचा पक्ष बनवायचा आहे, असेही ते म्हणाले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख