जितेंद्र आव्हाडांकडून महाविकास आघाडीला घरचा आहेर.. - NCP leader Jitendra Awhad criticizes ShivSena  Kalyan Dombivali | Politics Marathi News - Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांकडून महाविकास आघाडीला घरचा आहेर..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 जानेवारी 2021

आव्हाड यांनी शिवसेनेच्या आमदारांसमोरच सत्ताधाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

डोंबिवली : निवडणुकीच्या रिंगणात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा मुद्दा कायमच चर्चिला गेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करुन सत्ताधाऱ्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत असताना राष्ट्रवादीनेही रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी विधान करीत सेनेला घरचा आहेर दिला आहे. 

कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे विधान करीत त्यांनी महाविकास आघाडीतील सेनेच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे मंचावर उपस्थित होते. एकीकडे शिवसेना तरुणांना सेनेकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करीत असताना आव्हाड यांनीही तरुणांनी विचार करावा, असा सल्ला तरुणांना देत तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत रस्त्यांचा मुद्दाही चांगलाच गाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

कल्याण येथे एका क्रिकेट सामन्याला गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांसह सेना राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी शिवसेनेच्या आमदारांसमोरच सत्ताधाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेना भाजप युतीचा बालेकिल्ला आहे. कल्याण पश्चिमेत पहिल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले असताना या भागात राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी हे वक्तव्य करीत सेनेला कानपिचक्या दिल्या. भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यापूर्वीही डोंबिवली शहराचा अस्वच्छ शहर असा उल्लेख करीत भाजपला घरचा आहेर दिला होता. 

आता राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत असताना राष्ट्रवादीनेही रस्त्यांच्या दुरावस्थेविषयी विधान करीत सेनेला घरचा आहेर दिला आहे. अंबरनाथमध्ये काही महिन्यांपूर्वी आव्हाड यांनी महाविकास आघाडीविषयीच बोलताना येणाऱ्या काळात काय होईल हे सांगता येत नाही. परंतू आता तरी ते आपले मित्र असल्याने त्यांच्यावर टिका करता येत नाही. परंतू येणारा काळ अवघड असून युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. 

महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्याने येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहीले आहे. 

येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. कल्याण पत्रीपूल, कोपर उड्डाण पूल, दुर्गाडी पूल, मानकोली पूल यांची कामे रेंगाळली होती, कल्याण शीळ रोडचे सीमेंट कॉंक्रीटीकरणाचे कामही रेंगाळलेले आहे. त्यामुळे रस्त्यांचा मुद्दा येत्या निवडणुकीत चांगलाच गाजणार असून राजकीय नेते या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार अशी चर्चा रंगू लागली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख