राष्ट्रवादी काँग्रेस ठरला देशातील पहिला पक्ष..नवीन सेलची स्थापना - NCP became the first party in the country Establishment of a new cell | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस ठरला देशातील पहिला पक्ष..नवीन सेलची स्थापना

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एल.जी.बी.टी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ​

मुंबई : एल.जी.बी.टी (समलैंगिक) समुहासमोर शिक्षण, आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसने हे वचन पूर्ण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एल.जी.बी.टी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला पक्ष आहे ज्याने युवती सेलची स्थापना केली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस समलैंगिक समूह विभाग स्थापन करणाराही देशातील पहिला पक्ष ठरला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

एल.जी.बी.टी समूहासमोर शिक्षण, आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते. हे वचन पूर्ण करण्यासाठी आज एक पाऊल पुढे टाकले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 

या सेलच्या माध्यमातून एल.जी.बी.टी समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करत सुप्रिया सुळे, प्रिया पाटील यांनी या सेलच्या उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. एल.जी.बी.टी समुहाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी सेलद्वारे कार्यक्रम आखण्यात आला आहे, येत्या काळात हा कार्यक्रम यशस्वी करू, असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.  

राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला पक्ष आहे ज्याने युवती सेलची स्थापना केली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस समलैंगिक समूह विभाग स्थापन करणाराही देशातील पहिला पक्ष ठरला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत, म्हणून या सेलची स्थापन केली आहे.

या सेलच्या  माध्यमातून समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी समलैंगिक समूहाच्या प्रश्नांसाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, येत्या काळात त्याबाबतही पुढाकार घेणार असल्याचे सुप्रियाताईंनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात एल.जी.बी.टी समूह १०-१२% आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची दखल समाजाकडून घेतली जात नाही, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समलैंगिक समूह विभागाच्या माध्यमातून आम्ही त्यांची दखल घेऊ, समानता, रोजगाराबाबत पुढाकार घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असा विश्वास सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांनी व्यक्त केला.

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख