राणेंकडून कार्यकर्त्यांचा वापर 'स्वार्थासाठीच'   - Narayan Rane used the activists for selfish ends | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंकडून कार्यकर्त्यांचा वापर 'स्वार्थासाठीच'  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

माझ्या अनुभवानुसार नारायण राणे ज्या-ज्या पक्षात गेले त्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा वापर केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कुटुंबियांच्या फायद्यासाठीच त्यांनी करून घेतला, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला. 

कणकवली: जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवरून नाराज असलेले, मूळ भाजपच्या राजीनामा दिलेल्या सदस्यांना पदे नाकारून नारायण राणेंनी त्यांची पत दाखवून दिली, असा टोमणा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सोमवारी मारला. माझ्या अनुभवानुसार नारायण राणे ज्या-ज्या पक्षात गेले त्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा वापर केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कुटुंबियांच्या फायद्यासाठीच त्यांनी करून घेतला, असा गंभीर आरोपही पारकर यांनी केला. 

एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कासार्डे मतदारसंघाचे जि. प. सदस्य संजय देसाई यांनी राजीनामा दिला. भाजपचे हे जि. प. सदस्य पक्षाशी निष्ठावंत असूनही त्यांना पदे नाकारून केवळ एक सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली. नारायण राणेंच्या दृष्टीने राजेंद्र म्हापसेकर, संजय देसाई व भाजपच्या इतर मूळ सदस्यांची कुवत नसल्याने त्यांना पदे नाकारून इतरांना संधी देण्यात आली. त्यामुळे राणे मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत देत नाहीत हे राणे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे, असेही पारकर म्हणाले.  

मूळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही राणे अशाच प्रकारे वापर करून घेत आहेत. राणे समर्थकांच्या भाजप पक्षातील हस्तक्षेपामुळे भाजपचे मूळ निष्ठावंत कार्यकर्ते दूर फेकले गेले आहेत. राणेंच्या अस्तित्वहीन झालेल्या स्वाभिमान पक्षाला भाजपने आपल्यात सामील करुन घेतले आणि स्वतः खासदारकी मिळवली आणि मुलाला आमदारकी मिळवून दिली. मात्र याची परतफेड म्हणून जि. प. अध्यक्ष व सभापती निवडित राणेंनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून केली. यामुळे मूळ भाजप कार्यकर्ता दुखावला गेला आहे, असेही ते म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख