औरंगाबाद ः आमदार तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांसाठी सामजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व साहित्य, कला क्षेत्रात काम करणाऱ्या बारा मान्यवरांच्या नावांची यादी त्यांच्याकडे सोपवली आहे. यामध्ये डाॅ. प्रकाश आमटे, मकरंद अनासपुरे, इंदोरीकर महाराज यांच्यासह अनेकांची नावे आहेत.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे पाठवलेल्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावाचा वाद न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ खडसे, राजु शेट्टी यांच्यासह काही नावांवर आक्षेप घेत त्यांचे सामाजिक योगदान नसल्यामुळे अशा लोकांना विधान परिषदेवर संधी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर रयत क्रांतीच्या वतीने ही नवी यादी राज्यपालांकडे सोपवण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी प्रत्येकी चार अशी एकूण बारा नावांच्या यादीला मंत्रीमंडळ बैठकीत ठराव घेऊन मंजुरी दिली होती. त्यांनतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या मंजुरीसाठी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य व देशपातळीवरील घडामोडी पाहता राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यामुळे राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या यादीतील काही नावांवर फुली मारली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्यासह काही नावांवर आक्षेप नोंदवणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या. त्यानंतर आता यावरून राजकारण सुरू झाले असून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या संघटनेच्या वतीने आज राजभवनात राज्यपालांची भेट घेत त्यांना विविध क्षेत्रात योगदान असणाऱ्या बारा व्यक्तीची स्वतंत्र यादी सोपवली आहे.
विज्ञान, कला, साहित्य,सहकार व समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याची महाराष्ट्राची परंपरा राहीली आहे. राज्यात अशी अनेक नावे आणि चेहरे आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे, पण त्यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली नाही.
अशा व्यक्तींना राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याची संधी द्यावी, आणि या नावांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्यपालांना करण्यात आली आहे.आता राज्यपाल या नावांचा विचार करणार? की मग महाविकास आघाडी सरकारने ठराव करून पाठवलेल्या नावांवरच शिक्कामोर्तब करतात, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ही आहेत नावे...
१ मकरंद अनासपुरे - कला व नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य
२. विठ्ठल वाघ - लेखक व साहित्यिक
३. विश्वास पाटील- लेखक व साहित्यिक
४. जहीर खान- क्रिकेट पटू
५. मंगलाताई बनसोडे- कला
६. अमर हबीब- पत्रकार व सामाजिक कार्य
७. निवृत्ती महाराज इंदोरीकर - सामाजिक कार्य व प्रबोधन
८. पोपटाराव पवार- सामाजिक कार्य
९. डाॅ. तात्याराव लहाने- सामाजिक कार्य व आरोग्य सेवा
१०. डाॅ. प्रकाश आमटे- सामाजिक कार्य
११. सत्यपाल महाराज- सामाजिक कार्य व प्रबोधन
१२. बुधाजीराव मुळीक- विज्ञान व शेतीविषयक अभ्यासक
Edited By : Jagdish Pansare

