महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; राजेश काळे यांना अटक  - MSEDCL employees beaten; Rajesh Kale arrested | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; राजेश काळे यांना अटक 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी कनेक्शन तोडल्याने काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. 

सोलापूर :  मित्राच्या घरातील वीज का कापली, याचा जाब विचारण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांनी मारहाण केली. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी कनेक्शन तोडल्याने काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोटणीस नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरा राजेश काळे आणि  इतर 6 जणांविरुद्ध महावितरण कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून कलम 353 नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री 2 च्या सुमारास काळेंना पोलिसांनी अटक केली आहे.

या अगोदर देखील उपमहापौर काळे यांनी उपायुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक झाली होती. दरम्यान, राजेश काळे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता काळेंच्या तडीपारसंदर्भात प्रस्ताव पोलिस तयार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी राजेश काळे यांना यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती. राजेश काळे यांच्याविरुद्ध 29 डिसेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पुढील काही दिवस राजेश काळे फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यावरुन पाठलाग करत काळे यांना टेंभूर्णी परिसरात त्यावेळी अटक केली होती.  

नियमबाह्य कामांसाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणं, तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप राजेश काळे यांच्याविरुद्ध होते. सोलापूर येथील सामूदायिक विवाह सोहळ्यासाठी ई-टॉयलेटसह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राजेश काळे यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ही कामे नियमबाह्य असल्याचे सांगत यासाठी पत्रव्यवहार होणे अपेक्षित असल्याचं पांडे यांनी उपमहापौर राजेश काळे यांना सांगितल्यानंतर संतापलेल्या काळे यांनी पांडे यांना अर्वाच्च शिवीगाळ केली. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजेश काळे यांच्यावर आतातरी कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख