MPSC Exam : ठाकरे सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा छळ करीत आहेत...शेलार भडकले.. - MPSC exams BJP leader Ashish Shelar attacks government  | Politics Marathi News - Sarkarnama

MPSC Exam : ठाकरे सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा छळ करीत आहेत...शेलार भडकले..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

"एमपीएससी विद्यार्थ्यांचा जो मानसिक आणि शारिरीक छळ झाला त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे," असा आरोप आशिष शेलार यांनी  केला. 

मुंबई : राज्य सरकारने काल एमपीएससीच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. या परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या २१ मार्चला ही परिक्षा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. "एमपीएससी विद्यार्थ्यांचा जो मानसिक आणि शारिरीक छळ झाला त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे," असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. 

शेलार म्हणाले की ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. सचिव आणि मंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे असे प्रकार होत आहे. पण 14 तारखेच्या परीक्षेसाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थांची 21 तारखेपर्यंत सोय करावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नौटंकी करून काल याबाबत ट्विट का केलं. त्याचं सरकार ऐकत नाही का ? ही परीक्षा पुढे ढकलण्यामागे काय कारण होतं हे तपासणे गरजेचे आहे. 

"पोलिस अधिकारी सचिन वाझेंवर ठाकरे सरकारचे एवढं प्रेम का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाझेंची वकिली का करीत आहेत. मनसुख हिरेन यांना वाझे म्हणाले होते की तू अटक करून घे, मी तुला जामीन देतो. सचिन वाझे यांना सर्व काही माहित होते, त्यांचं निलंबन केलं पाहिजे तसेच मनसुख हिरेन यांच्या पत्नीला सरकारने संरक्षण दिले पाहिजे," अशी मागणी शेलार यांनी केली आहे.  

"हिंदुविरोधी व्यक्तव्य करणारा शरजिल उस्मानी हा महाराष्ट्राबाहेर कसा पळून गेला. त्याला मुंबईतून बाहेर जाण्यास कोणी ग्रीन सिग्नल दिला, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्याला मदत करणाऱ्या दोन मंत्र्याची नावे सरकारने जाहीर करावी," अशी मागणीही शेलार यांनी केली आहे. 
  
२७ मार्च रोजी होणारी राज्य अभियांत्रिकी पूर्व परिक्षा व १९ एप्रील रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट पूर्व परिक्षा व संयुक्त पूर्व परिक्षा २०२० यांच्या तारखांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे शासनाने कळवले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख