हे राज्य कोण चालवत आहे ? महाविकास आघाडी की सचिव मंडळी? - MPSC Exam BJP leader MLA Atul Bhatkhalkar has targeted the government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

हे राज्य कोण चालवत आहे ? महाविकास आघाडी की सचिव मंडळी?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

राज्यातील कोरोनाचा नायनाट करून २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा घेणार आहे का?  निदान आता तरी या परीक्षा शेवटच्या क्षणी रद्द करू नका...

मुंबई : एमपीएससीची काल पुढे ढकलेली परीक्षा आता 21 तारखेला होणार आहे. काल ही परीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती, "याबाबत माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे," असे मंत्री  वडेट्टीवार म्हणाले होते. यावरून भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

अतुल भातखळकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत, एवढं हे दुबळं सरकार आहे, असाच होतो... हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?...ठाकरे सरकार आठवड्याभरात राज्यातील कोरोनाचा नायनाट करून २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा घेणार आहे का?  निदान आता तरी या परीक्षा शेवटच्या क्षणी रद्द करू नका...

"एमपीएससी विद्यार्थ्यांचा जो मानसिक आणि शारिरीक छळ झाला त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे," असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. शेलार म्हणाले की ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. सचिव आणि मंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे असे प्रकार होत आहे. पण 14 तारखेच्या परीक्षेसाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थांची 21 तारखेपर्यंत सोय करावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नौटंकी करून काल याबाबत ट्विट का केलं. त्याचं सरकार ऐकत नाही का ? ही परीक्षा पुढे ढकलण्यामागे काय कारण होतं हे तपासणे गरजेचे आहे. 
  
२७ मार्च रोजी होणारी राज्य अभियांत्रिकी पूर्व परिक्षा व १९ एप्रील रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट पूर्व परिक्षा व संयुक्त पूर्व परिक्षा २०२० यांच्या तारखांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही,
असे शासनाने कळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. कोरोनामुळे ही परीक्षा आतापर्यंत तब्बल सहावेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. या निर्णयानंतर विरोधाचा पहिला भडका पुण्यात उडाला. त्यानंतर निषेधाचे लोण संपूर्ण
राज्यभर पसरले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख