`मूड ऑफ नेशन`, भाजपच्या बाजूने, पदवीधर निवडणूकीतही ते दिसेल.. - Mood of Nation`, on the side of BJP, it will be seen in graduates | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

`मूड ऑफ नेशन`, भाजपच्या बाजूने, पदवीधर निवडणूकीतही ते दिसेल..

जगदीश पानसरे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

तुम्हाला बातम्या नसता तेव्हा तुम्ही पकंजा मुुंडे नाराज असल्याच्या बातम्या चालवता. बोराळकर हे गोपीनाथ मुंडे यांचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी मुंडे साहेंबानीच त्यांना उमेदवारी दिली होती, पंकजा देखील त्याच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे बोराळकरांना त्यांच्या विरोध किंवा उमेदवारीवरून नाराजी कशी असेल? असा उलट सवाल फडणवीस यांनीच केला.

औरंगाबाद ः  देशातील उत्तर, पश्चिम, दक्षिण अशा सगळ्याच भागात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. जनतेने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि भाजपवर विश्वास दाखवला आहे. मुड ऑफ नेशन भाजपच्या बाजूने असून महाराष्ट्रातील पाच पदवीधर आणि एका स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील हेच चित्र दिसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

औरंगाबाद येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिराष बोराळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळावा आणि बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना हसतखेळत उत्तरे देतांनाच त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टिकाही केली.

फडणवीस म्हणाले, आमचं सरकार होतं तेव्हा मराठवाडा हा आमच्या अजेंड्यावर होता. मराठवाडा वाॅटरग्रीड सारखी महत्वाची योजना, डीएमआयसी, समृद्धी महामार्ग, शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६८० कोटींची योजना असे अनेक प्रकल्प हाती घेऊन आम्ही ते दाखवून दिले. पण राज्यात तीन पक्षांचे सरकार आले आणि त्यांनी या सगळ्या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या. या सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कुठे दिसत नाही, राज्याच्या एका विशिष्ट भागासाठी काम करणारे हे सरकार आहे.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या व्यावसायिक, व्यापारी, सामान्य कर्मचारी, भाजीवाले, टपरीधारक, छोटे मोठे व्यावसायिक अशा कुणालाच सरकारने मदत केली नाही, किंवा त्याच्यासाठी पॅकेज जाहीर केले नाही. फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत. सरकारमध्ये समन्वय नाही, एक मंत्री वीज बील माफी देऊ म्हणून घोषणा करतात आणि पुन्हा वेगळीच भूमिका घेतात. अभ्यास केला नव्हता आता ते सांगत असले तरी त्यांचा प्रस्तावच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला हे त्यामागचे सत्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यापुढे तुम्हाला योग्यवेळी शपथ घेतांना दिसेन...

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापुर्वी भाजपने अजित पवार यांना हातशी धरून भल्या पहाटे फडणवीस यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या घटनेला वर्ष झाल्याची आठवण पत्रकारांनी फडणवीसांना करून दिली. यावर स्मितहास्य करत फडणवीस म्हणाले, अशा गोष्टींची आठवण करून द्यायची नसते, पण यानंतर तुम्हाला भल्या पहाटेचा शपथविधी पहावा लागणार नाही, योग्यवेळी शपथ घेतांनाच दिसेल.

पकंजा मुंडे नाराज आहेत का? या प्रश्नावर देखील फडणवीस यांनी फिरकी घेत तुम्हाला बातम्या नसता तेव्हा तुम्ही पकंजा मुुंडे नाराज असल्याच्या बातम्या चालवता. बोराळकर हे गोपीनाथ मुंडे यांचे उमेदवार आहेत. गेल्यावेळी मुंडे साहेंबानीच त्यांना उमेदवारी दिली होती, पंकजा देखील त्याच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे बोराळकरांना त्यांच्या विरोध किंवा उमेदवारीवरून नाराजी कशी असेल? असा उलट सवाल फडणवीस यांनीच केला.

बोरळाकर यांना पदवीधर मतदारांचा मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून विद्यमान आमदरांच्या विरुद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा दावा करतांनाच पदवीधर निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित होणार, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख