Modi's address to the nation with Bihar elections in mind | Sarkarnama

बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मोदींचे देशाला उद्देशून भाषण 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 30 जून 2020

ज्या पद्धतीने भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांच्या राष्ट्र संबोधनाचा उदो उदो करण्यात आला होता. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग व लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांसाठी भरीव मदत करतील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांची घोषणा करतील. सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनला लाल डोळे दाखवतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भाषणातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे.

मुंबई : ज्या पद्धतीने भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांच्या राष्ट्र संबोधनाचा उदो उदो करण्यात आला होता. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग व लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांसाठी भरीव मदत करतील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांची घोषणा करतील. सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनला लाल डोळे दाखवतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भाषणातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

या संदर्भात बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गरीब वर्गाकरिता प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्याची योजना लागू करण्यात आली होती. आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या मेहनतीने देशात प्रचंड मोठा अन्नधान्याचा साठा उपलब्ध असल्याने कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी ही योजना सप्टेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली होती. अगोदरच्याच योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय हा प्रशासकीय असल्याने राष्ट्र संबोधनाची आवश्‍यकता नव्हती, पण कदाचित बिहारच्या निवडणुका पंतप्रधान मोदींकरिता महत्वाच्या असाव्यात; म्हणून त्यांनी स्वतः या योजनेला दिलेली मुदतवाढ जाहीर केली असावी. 

गोरगरिबांना अन्नाव्यतिरिक्त इतरही गरजा असतात, त्यांचे काय? याबद्दल पंतप्रधानांनी अवाक्षरही काढले नाही. पाच किलो गहू किंवा तांदूळ व एक किलो चना ही मदत अत्यंत तुटपुंजी असून रोजगार गेलेल्या गरिबांचे कुटुंब महिनाभर यावर चालणार नाही. गरिबाचे घर चालवायचे असेल तर त्यांना रोख मदत देण्याची आवश्‍यकता आहे. राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरीबांच्या खात्यात प्रति महिना 7500 रुपये एवढी मदत थेट द्यावी, तरच त्यांचे घर सुरळित चालेल, असे महसूल मंत्री थोरात म्हणाले. 

नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे संकट राहणार आहे, अशी अप्रत्यक्षच कबुलीच पंतप्रधानांनी आज दिलेली आहे. त्यामुळे गरिबांसाहित मध्यमवर्ग, नोकरदार व बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. कोरोनासंदर्भात देश समाधानकारक कामगिरी करत आहे, असे आश्‍चर्यकारक विधान पंतप्रधानांनी केले. कोरोनाच्या रुग्णसंख्येत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडे कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही, हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. 

चीनच्या संदर्भात पंतप्रधान ठोस भूमिका घेतील, ही देशवासियांची अपेक्षा देखील फोल ठरली आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख