अंबरनाथमधील मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची धारधार शस्त्राने हत्या - MNS vice-president Rakesh Patil killed with a sharp weapon in Ambernath | Politics Marathi News - Sarkarnama

अंबरनाथमधील मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश पाटील यांची धारधार शस्त्राने हत्या

अजय दुधाणे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

हल्ल्यात जखमी राकेश पाटील यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. 

अंबरनाथ :  अंबरनाथ मधील पाले गावात असलेल्या पटेल आर मार्ट या शॉपिंग मॉल बाहेर उभे असलेले अंबरनाथ शहराचे मनसेचे उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बुधवारी सांयकाळी हा हल्ला झाला. हल्ल्यात जखमी राकेश पाटील यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. 

हा हल्ला सहा जणांनी केला असून ते दोन कार मधून आल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हि हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या झाल्याचे कळताच अंबरनाथ सहाययक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी जवळील उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड पोलिसांना अलर्ट केले आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान  काही तासातच मुरबाड पोलिसांनी चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. आता दोन आरोपींच्या शोध कामी पोलीस लागले आहेत. 

या घटनेने अंबरनाथ मधील पालेगाव परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी नागरीक अक्षरशः त्रस्त झाले. त्यातच राज्याच्या वेगवेगळ्या भागात खूनाच्या घटना वारंवार घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका राजकीय पदाधिकाऱ्याचा खून झाला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी घडलेल्या दोन घटनांमुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची वस्तुस्थिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात खुनाच्या घटना सतत घडत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात चार दिवसांपूर्वीच युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांचा खून झाला आहे. तर दोन दिवसापूर्वी लोणावळा येथे एका शिवसैनिकाची हत्या करण्यात आली होतीय  

खराडी येथे एका सराईत गुन्हेगाराचा सोमवारी सकाळी दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. खराडीतील खुनाची घटना ताजी असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या स्टेट बॅंकेजवळील पदपथावर एका 60 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

ही घटना दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. यात संबंधीत बांधकाम व्यावसायिक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
पोलिस आयुक्तालय व बंडगार्डन पोलिस ठाणे हे गोळीबाराची घटना घडलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असतानाही थेट या परिसरात येऊन गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे पुणे शहरात सकाळी खून, दुपारी गोळीबार आता रात्री नेमके वाढून ठेवले आहे, असा प्रश्‍न पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख