राज ठाकरेंचं महाराष्ट्राला आवाहन...विचार करण्यापेक्षा कृती करा...

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.
marathi26.jpg
marathi26.jpg

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त (ता.27) पत्रक काढून मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.

"मनसेने हा दिवस साजरा करायला सुरुवात केल्यानंतर हा दिवस मनात राहू लागला याचा मला अभिमान आहे," असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. "मराठी भाषेचं काय होणार याचा विचार करण्यापेक्षा कृतीतून त्यासंदर्भात गोष्टी घडणं महत्त्वाचे आहे, मराठीतून स्वाक्षरी करायला सुरुवात करू या, मनसेच्या शाखाशाखात फलक लावलेत, तिथे जाऊन मराठीत स्वाक्षरी करा," असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्रात केलं आहे. 

राज ठाकरे पत्रात म्हणतात...

माझ्या तमाम मराठी बंधू-भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र…
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका।।

हे तळमळीने सांगणाऱ्या आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी… आपण सारे जण ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करतो. सरकारी कॅलेंडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायला सुरुवात केल्यावर आपल्या मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला. आणि अर्थातच ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे.

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे 358 दिवस ह्या सगळ्याचा विसर पडेल. मुळात मराठीचं काय होणार ह्या पेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल ह्याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणं हे जास्त महत्वाचं आहे.

आपली मराठी भाषा ही इतकी लेचीपेची अजिबात नाही की जिच्यासाठी आसवं गाळत बसावी. ही भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे ह्याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली ही भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते समर्थ रामदासस्वामींच्या मुखी असलेली ही भाषा, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ‘ म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हीच मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण हीच मातृभाषा.

लता दीदींच्या आणि आशा ताईंच्या गोड गळ्यातून पहिले शब्द जे निघाले ते ह्याच भाषेतले आणि १८४३ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीला देखील दखल घ्यायला लावली ती देखील मराठी रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारं कार्य करणारी ८ भारतरत्नही ह्या भूमीतीलच. ह्या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला, ह्या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला, ह्या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला विचार दिला अशा भाषेचं काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून, इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत आणि ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो, तरी पुरेसं आहे.

मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरु करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांमध्ये फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा. बाकी तुम्हा सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
जय हिंद जय महाराष्ट्र !


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com