“तुम्ही नाईट पार्ट्या करता, मग लोकांना बंधन का ? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल - MNS Leader Sandeep Deshpande on cm Thackeray Govt Night Curfew | Politics Marathi News - Sarkarnama

“तुम्ही नाईट पार्ट्या करता, मग लोकांना बंधन का ? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

राज्यातील संचारबंदीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

राज्यातील संचारबंदीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी टि्वट करून राज्यातील संचारबंदीवर टीका केली आहे. “तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे” असा निशाणाही देशपांडेंनी ठाकरे सरकारवर साधला आहे. 

“काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली?” असे सवाल संदीप देशपांडे यांनी ठाकरेंना विचारला आहे. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना कालपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल.

त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख