पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला... - mla Rohit Pawar FB Post On mp Sharad Pawar Women Empowerment  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 डिसेंबर 2020

शरद पवार यांच्याबाबच रोहित पवार यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई : "महिला भगिनी आज मोठ्या हिमतीने गावगाड्यापासून शहरापर्यंतचा कारभार हाकतात. त्यामुळं राज्यातील स्त्रियांसाठी पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला, असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, " असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्यात महिला धोरण राबविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबच रोहित पवार यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. 

महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार म्हणतात. “आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या ८० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहीलच पण सामाजिक जडणघडणीत हे निर्णय एक मैलाचा दगड ठरतील,"  

फेसबूकपोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात...
आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या ८० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहीलच पण सामाजिक जडणघडणीत हे निर्णय एक मैलाचा दगड ठरतील, असा मला विश्वास आहे.
स्त्री सशक्तीकरण हा फक्त बोलण्याचा शब्द नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याची किमया कुणी केली असेल तर ती पवार साहेबांनी. महिलांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकतात, यावर साहेबांचा पहिल्यापासून विश्वास आहे आणि या विश्वासाच्या बळावरच त्यांनी महिलांना राजकारण, समाजकारणात बरोबरीने संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1993 साली पवार साहेबांनी देशात पहिल्यांदा राज्यात महिला धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. 

निर्णयप्रक्रियेत त्यांना सामावून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद केली गेली, आज ती 50% पर्यंत वाढलीय. महिला आणि बालविकासासाठी जिल्हा परिषद पातळीवर वैधानिक समिती निर्माण करुन या समितीचं अध्यक्षपद महिलांकडेच राहील याची काळजी घेतली. या धोरणामुळं समाजात अनेकांना धक्के बसणार होते, पण त्यामुळं काही नुकसान होणार नाही यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती केली. महिला आणि बालकल्याण हे खाते वेगवेगळे केले. महिला कल्याण सक्षमीकरणाची संकल्पना घेऊन सुरू झालेला हा विचार पवार साहेबांच्या प्रयत्नांमुळे महिला विकासाला चालना देणारा ठरला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला भगिनी मोठ्या हिमतीने गावगाड्यापासून शहरापर्यंतचा कारभार हाकतात. त्यामुळं राज्यातील स्त्रियांसाठी पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला, असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही..!

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख