ठाकरे-पवारांच्या घरासमोर ढोल वाजवणार : पडळकर यांचा इशारा - Mla Gopichand Padalkar Warns Agitation over Dhangar Reservation | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे-पवारांच्या घरासमोर ढोल वाजवणार : पडळकर यांचा इशारा

भारत नागणे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले. पंढरपुरात ही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा वाळवंटात सरकार विरोधात ढोल वाजवून आंदोलन केले.

पंढरपूर : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सरकारने  धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा, अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर  ढोल वाजवून आंदोलन केले  जाईल, असा इशारा भाजप आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात दिला.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात ढोल बजाव सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले. पंढरपुरात ही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा वाळवंटात सरकार विरोधात ढोल वाजवून आंदोलन केले. यावेळी आमदार पडळकरांनी राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्र्यांनाही  इशारा देत, धनगरांच्या भावनेशी तुम्ही खेळाल तर ते सरकारला महागात पडेल असे सूचक विधान केले.  

आज धनगर समाज बांधवांनी आज सकाळ पासूनच आंदोलनासाठी  चंद्रभागा नदीकाठावर मोठी गर्दी केली होती. हातात पिवळे ध्वज घेवून आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये गावोगावातून आलेले हजारो  धनगर बांधव ढोल वाजवत आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. ढोलाच्या निनादाने चंद्रभागेचा तीर दुमदूमून गेला होता. दुपारी ११ वाजता आमदार पडळकर पंढरपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गळयात ढोल बांधून सरकार विरोधात ढोल वाजवला.यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत, राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलना नंतर आमदार पडळकर यांनी नामदेव पायरीचे व तेथूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी  ठाकरे - पवार  सरकारला धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची  सु बुध्दी द्यावी असे साकडं ही  विठ्ठलाला घातले. दुपारी १ वाजता तहसीलदार वैशाली वाघमारे यांना आरक्षण मागणीचे लेखी निवेदन दिले. त्य़ानंतर आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनामध्ये  अहिल्या देवी होळकर यांचे वंशज   भुषणसिंह राजे होळकर,  धनगर आरक्षण समितीचे प्रा. सुभाष मस्के, माऊली हळणवर, संजय माने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंढरपूर शहरात व आंदोलनस्थळी   मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी आमदार पडळकर म्हणाले, ''आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची  लढाई करत आहे. आरक्षण मागणीसाठी   राज्यभरातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. सरकारने त्यांच्या  भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करु नये. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज राज्यभरात ढोल आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला  सत्ताधारी महाविकास आघाडीने तातडीने एसटी प्रवर्गाचे दाखले द्यावेत.''

''सरकारने आंदोलनाची दखल घेवून आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा, अन्यथा यापुढच्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. राज्यातील मंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन केले जाणा आहे. त्यानंतही झोपलेल्या सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री  आणि शरद पवार यांच्या  सिल्वर ओक या मुंबईतील घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केले जाईल,'' असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख