भाजपवर नाराज असलेल्या आमदार शिवसेनेत.. मीरा भाईंदरमध्ये राजकीय समीकरणे बदलणार.. - MLA Geeta Jain entry into Shiv Sena the political equations in Mira Bhayander will change | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपवर नाराज असलेल्या आमदार शिवसेनेत.. मीरा भाईंदरमध्ये राजकीय समीकरणे बदलणार..

संदीप पंडित
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले.

मीरा भाईंदर : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला अधिकृतपणे रामराम ठोकलेला असतानाच मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. "मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल", असा विश्वास गीता जैन यांनी शिवसेना प्रवेशानंतर व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. गीता जैन यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केल्याने येणाऱ्या काळात मीरा भाईंदर मधील राजकीय समीकरणे बदलतात का? याकडे लोकांचे लक्ष  लागून राहिले आहे.

"गीता जैन यांच्या प्रवेशामुळे पक्षवाढीसाठी आणखी बळ मिळेल. भाजपला काय फटका बसतो, हे पुढच्या काळात पाहायला मिळेल", असे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मिरा भाईंदर महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याचा विश्वास शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.  

आमदार गीता जैन म्हणाल्या, “माझ्या प्रवेशामुळे भाजपला धोका आहे की नाही, ते भाजपने ठरवावं. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकासकामाच्या आश्वासनामुळे मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. बंडखोर म्हणून मी निवडून आले, पण मी भाजपला समर्थन दिलं होतं. परंतु पक्षश्रेष्ठींकडून वचनपूर्तता झाली नाही. मिरा-भाईंदरमधील भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत. वेळ आल्यावर ते शिवसेनेत प्रवेश करतील. पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल."

ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच आमदार गीता जैन या भाजपवर नाराज होत्या.  अपक्ष निवडणूक आल्यावर त्यांनी  यांनी भाजपला समर्थन दिलं होतं. मिरा भाईंदरची कमान भाजप आपल्या हातात देईल, असा विश्वास गीता जैन यांना होता. मात्र स्थानिक भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
  
माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुळे गीता जैन यांची घुसमट होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे . गीता जैन यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने आता मीरा भाईंदर मधील दोन्ही मतदार संघावर( ओवळा माजिवडे व भाईंदर) शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 

आज पक्षप्रवेशावेळी त्यांच्या बरोबर माजी नगरसेविका सुमन कोठारी आणि इतर समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी युवा सेनाप्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र पाठक, माजी आमदार गिलबर्ट मेंडोसा आणि शिवसेना पक्ष प्रवक्ता आणि आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. 
    

गीता जैन या विद्यमान भाजपच्या नगरसेविका असून गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करुन त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी लगेचच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, भाजपमध्ये त्यांच्या मताला महत्त्व देण्यात न आल्याने गेल्या वर्षभरापासून त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. त्यातूनच आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गीता जैन यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

गेल्यावर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिरा भाईंदर मतदारसंघासाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांची मागणी नाकारत पक्षाने नरेंद्र मेहता यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे गीता जैन यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडून आल्या. भाजपच्या काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांनीही त्यांना निवडणुकीत साथ दिली होती. मात्र, निवडून येताच त्यांनी राज्यात भाजपलाच समर्थन दिले होते. मिरा भाईंदर भाजपची आणि त्याचबरोबर महापालिकेची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे द्यावी असा आग्रह जैन यांनी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाकडे  धरला होता. मात्र पक्षाने त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. 

गीता जैन अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी महापालिकेत त्या आजही भाजपच्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. परंतू महापालिका कामकाज, पदाधिकार्‍यांची निवड, स्थानिक पातळीवरील पक्ष पदाधिकार्‍यांच्या नेमणूका या सर्वांपासून जैन यांना नरेंद्र मेहता गटाने बाजुलाच ठेवले आणि पक्षाने देखील मेहता यांनाच साथ दिली. त्यामुळेच निराश झालेल्या जैन यांनी गेल्यावर्षी आपला भाजपशी संबंध नसून आपण अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख