मराठवाडा पदवीधरः पोस्टल मतमोजणीत सतीश चव्हाण यांना आघाडी - Marathwada Graduates: Leading Satish Chavan of Mahavikas Aghadi in postal counting | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरः पोस्टल मतमोजणीत सतीश चव्हाण यांना आघाडी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील तब्बल बारा हजार मते बाद झाली होती. या निडणुकीत देखील त्याची  पुनरावृत्ती होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. पोस्टलमध्ये मोठ्या प्रमाणात मते बाद झाल्यामुळे पाच फेऱ्यांमध्ये बाद मतांचे प्रमाण देखील मोठे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबा - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला दुपारी सुरूवात झालीपोस्टल मतमोजणीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी ६०० मते घेत ३१४ मतांची आघाडी घेतली. तर शिरीष बोराळकर यांना २८६ मते मिळाली. एकूण १२४८ मतांपैकी १०७३ मते वैध ठरली आहेत. तर १७५ मते बाद झाली.

मराठवाडा पदवीधर मतमोजणीचे कल यायला सुरूवात झाली असून पहिल्या फेरीतील २० हजार मतांच्या मोजणीत देखील सतीश चव्हाण आघाडीवर असल्याचे समजते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठवाजेपासून सुरूवात झाली. चिकलठाणा एमआयडीसीतील मराठवाडा रियल्टर्स कंपनीत या मतमोजणीला सुरूवात झाली. 

पोस्टल मतमोजणीत पावणे दोनशे मते बाद झाली आहेत. यात प्रामुख्याने मतदारांनी मतपत्रिकेवर पसंती क्रमांक टाकण्याऐवजी मराठा आरक्षण, मोबाईल क्रमांक, स्वतःचे नाव, राईटच्या खुना केल्याचे प्रकार समोर आले आहेत. पदवीधर हे सुशिक्षत असल्यामुळे त्यांचे मतदान बाद होणे अपेक्षित नसते. परंतु हा मुद्दामहून केलेला प्रकार असल्याची चर्चा आहे. 

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील तब्बल बारा हजार मते बाद झाली होती. या निडणुकीत देखील त्याची  पुनरावृत्ती होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. पोस्टलमध्ये मोठ्या प्रमाणात मते बाद झाल्यामुळे पाच फेऱ्यांमध्ये बाद मतांचे प्रमाण देखील मोठे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून खास व्हिडिओ तयार करून त्यामध्ये मतदान कसे करायचे, पसंती क्रमांक कसा टाकायचा, कोणत्या भाषेत टाकायचा, चिन्हाचा वापर करायचा नाही, एकाचवेळी अनेक उमेदवारांना पहिली पंसती द्यायची नाही, मत कसे बाद होऊ शकेल या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. परंतु त्याचा किती फायदा झाला, हे संपुर्ण मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यावरच समोर येईल.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख