ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे निधन - marathi Cinema Thane Marathi  Actor Ravi Patwardhan Passed Away | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 डिसेंबर 2020


झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे चित्रपटसृष्टीत ते प्रसिद्ध होते.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (वय 83) यांचे आज ठाण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुलं, सून, नातवंडे असा परिवार आहे. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना काल रात्री श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ठाण्यातील पाचपाखडी येथे राहणाऱ्या रवी पटवर्धन यांच्यावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत

गेल्या मार्चमध्ये त्यांना  हृदयविकाराचा झटका आला होता. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 200 हून अधिक चित्रपटात तर 150 हून अधिक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. 
झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे चित्रपटसृष्टीत ते प्रसिद्ध होते. पोलिस पाटील, सरपंच, न्यायाधीश, तर काही खलनायकाच्या भूमिकाही पटवर्धन यांनी साकारल्या होत्या. 

ते रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरीला होते. नोकरी सांभाळून नाटकात काम करण्याची त्यांची आवड त्यांनी जपली.  1974 मध्ये रवी पटवर्धन यांनी आरण्यक या नाटकात भूमिका केली होती. 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणारे रवी पटवर्धन यांनी नुकतीच आग बाई सासूबाई ही मालिका केली होती. 

संबंधित लेख