मराठा आरक्षण : अंतरिम आदेशाला येत्या मंगळवारपर्यंत आव्हान : अशोक चव्हाण 

नेमके कोणते पर्याय योग्य आणि टिकणारे आहेत, यावर कायदेशीर मत घेण्यात आले आहे.
Maratha reservation: Challenge to interim order till next Tuesday: Ashok Chavan
Maratha reservation: Challenge to interim order till next Tuesday: Ashok Chavan

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आव्हान दिले जाईल, असे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी सांगितले. त्यानुसार पुढील निर्णय लवकरच जाहीर होतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

न्यायालयाचा अंतरिम आदेश आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा राज्य सरकारने सखोल आढावा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढणे, सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या खंडपीठाकडे जाऊन फेरविचार याचिका करणे, घटनापीठाकडे जाऊन आदेश निरस्त करण्याची विनंती करणे, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणे, विविध अभ्यासक्रमांच्या जागा वाढवणे, असे अनेक पर्याय, सूचना समोर आल्या आहेत.

यातील नेमके कोणते पर्याय योग्य आणि टिकणारे आहेत, यावर कायदेशीर मत घेण्यात आले आहे. हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांसमोर असून ते योग्य निर्णय जाहीर करतील, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

याबाबत मराठा समाज, अनेक विधीतज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते आणि विविध राजकीय पक्षांशी सुद्धा चर्चा झाली. आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नाही. न्यायालयीन लढाई न्यायालयातच करावी लागेल. ती रस्त्यावर होणार नाही. सरकार कमी पडते, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी हस्तक्षेप याचिका करून आपलेही वकील लावावेत. त्यातून आरक्षणाची बाजू अधिक मजबूत होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. 

गेल्या 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला असला तरी या प्रकरणाची अजून अंतिम सुनावणी किंवा अंतिम निर्णय झालेला नाही. हे प्रकरण आता घटनापीठाकडे सोपविण्यात आले आहे.

विधीमंडळातील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने विधेयक मंजूर करून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला आहे. या कायद्याला संवैधानिक दर्जा असलेल्या राज्य मागास आयोगाच्या शिफारसींचा भक्कम कायदेशीर आधार आहे. या कायद्याच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयानेही दीर्घ आणि सखोल सुनावणीनंतर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्याचे चव्हण म्हणाले. 

आदेश आश्‍चर्यकारक! 

आरक्षणाच्या लढ्यात राज्य सरकार कुठेही कमी पडलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयात वकिलांची जी फौज जिंकली, तिच फौज सर्वोच्च न्यायालयात कायम आहे. उलट खासगी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी सारखे प्रसिद्ध वकील समोर आल्याने मराठा आरक्षणाची बाजू अधिक भक्कमपणे मांडली गेली.

आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण आणि तामिळनाडूतील आरक्षणाची प्रकरणे मराठा आरक्षणासारखीच आहेत. ती आरक्षणे आज लागू आहेत. पण, फक्त मराठा आरक्षण लागू न करण्याचा अंतरिम आदेश आला. हा आदेश अनपेक्षित व आश्‍चर्यकारक आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com