मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाचा  भाजप सोडून शिवसंग्राममध्ये प्रवेश   - Maratha Kranti Morcha coordinator Rajan Ghag quits BJP | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाचा  भाजप सोडून शिवसंग्राममध्ये प्रवेश  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

राजन घाग यांनी नुकताच आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा राजीनामा देऊन शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी समाजाचे कार्य प्रभावीपणे करता यावे, यासाठी भारतीय जनता पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम या मराठा संघटनेत नुकताच प्रवेश केला आहे. 

घाग यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठीची मोठी आंदोलने व प्रशासनासोबत चर्चा यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाजपमध्ये जिल्हा पदाधिकारी असलेले राजन घाग यांनी नुकताच आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा राजीनामा देऊन शिवसंग्राम संघटनेत प्रवेश केला.

मेटे हे मराठा समाजासाठी सतत कार्यरत असलेले व समाजासाठी सतत धावून येणारे कार्यकर्ते असल्याने आपण यापुढे समाजाच्या हितासाठी त्यांच्यासोबत वाटचाल करणार आहोत, असेही घाग यांनी सांगितले.

यापुढे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी व एकत्रीकरणासाठी काम करण्याचे घाग यांनी सांगितले. आज मराठा समाजासाठी आरक्षण अत्यंत जरुरीचे असताना सर्व राजकीय पक्ष राजकारण करत आहेत. अशा वेळी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन सर्व राजकीय पक्षांना मतपेटीतून धडा शिकवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणात सरकार आता न्यायालयात घेणार ही भूमिका...

मुंबई : येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या एसईबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने काल बैठक घेतली. उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या सुनावणीच्या तयारीच्या आढाव्यासह मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मराठा आरक्षण प्रकरणातील विशेष विधीज्ञ विजयसिंह थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, राज्य सरकारचे वकील अॅड. सचिन पाटील, अॅड. राहुल चिटणीस, राज्य सरकारने नेमलेल्या वकीलांच्या समन्वय समितीचे सदस्य अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोलेगावकर, अॅड. अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. येत्या ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सुनावणीबाबत सर्व मुद्यांची काच्या बैठकीत समिक्षा करण्यात आली. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय झाला व राज्याची भूमिका पुन्हा एकदा केंद्राला कळविण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय मराठा समाजाच्या इतरही प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख