बड्या नेत्यांच्या रात्रीच्या भेटीमुळे वाढले मनोहरमामाचे प्रस्थ!

बहुतांश दिग्गज मंडळी रात्रीच्या वेळीच मठात येऊन मनोहर भोसले याच्या पायावर डोके ठेवत असत.
Manohar Mama's popularity increased due to visit of big leaders
Manohar Mama's popularity increased due to visit of big leaders

पुणे : आपल्याला बाळूमामा प्रसन्न झाल्याचे सांगून रातोरात मनोहरमामा बनलेल्या मनोज भोसले याने बाळूमामानंतर मनोहरमामाच एक दैवी शक्ती आहे, असे भासवून गर्दी जमवत करमाळ्याच्या उंदरगावात आपले बस्तान बसविले. पण हे बस्तान बसविण्यात त्याला ग्रामीण नागरिकांपेक्षा शहरातील बडे प्रस्थ, अधिकारी वर्ग आणि नेतेमंडळींचा मोठा हातभार लागला. मनोहरच्या भूलभुलैयाचा करिश्मा राज्यातील पुढाऱ्यांबरोबरच आंध्र प्रदेश, तेलगंणा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला. राज्यातील बडी नेतेमंडळी ही रात्रीच्या वेळी मठात येऊन मनोहरची भेट घेत असत, त्यामुळे त्याचे प्रस्थ वाढत गेले. (Manohar Mama's popularity increased due to visit of big leaders!)

डीएडची पदवी घेऊनही नोकरी मिळत नसल्याने मनोहर याने उंदरगावच्या आसपासच्या गावांत भाजीपाला, सुकट बोंबील विकून गुजराण करण्यास सुरुवात केली. मात्र, एका अमावस्येच्या दिवशी आधीच पुरून ठेवलेला भंडारा जमिनीतून काढत मनोहरने आपले भोंदूगिरीचे दुकान जोरात सुरू केले. स्थानिक लोकांनी त्याला नाकारले. मात्र, शहरातील गर्दी वाढत गेली, तसा तो फेमस होत गेला. त्याची ख्याती ऐकून परराज्यातील लोकही उंदरगावात येऊ लागले. 

डीएडपर्यंतचे शिक्षण झालेल्या मनोहरने आपल्या अमोघ वक्तृत्वाने बघता बघता शहरी आणि बड्या लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यामुळे उंदरगावच्या मठात अनेक राजकीय नेते, अधिकारी आपले भविष्य पाहण्यासाठी येऊ लागले. या राजकीय नेत्यांच्या वाढत्या फेऱ्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही आपोआप मनोहरच्या मठाकडे ओढले गेले. 

मनोहर भोसलेच्या उंदरगाव येथील मठात आतापर्यंत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, आमदार रोहित पवार, माजी आमदार नारायण पाटील, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह पुण्या-मुंबईतील अनेक नगरसेवक व राज्यातील अनेक आमदार, खासदार यांनी भेट दिल्याचे बोलले जाते. यातील काही नेत्यांचे मनोहरसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. काही दिग्गज राजकीय नेतेमंडळी रात्री दहानंतर त्याला भेटायला येत असल्याची चर्चा आहे. काही नेत्यांना मनोहर हा स्वतः जाऊन भेटला आहे. 
 
रोहित पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार करण्यात आपला मोठा वाटा असल्याच्या बढाया मनोहर भोसले हा वारंवार मारत असे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे त्याचे फोटो सोशल मीडियात सध्या फिरत आहेत. बहुतांश दिग्गज मंडळी रात्रीच्या वेळीच मठात येऊन मनोहर भोसले याच्या पायावर डोके ठेवत असत. मंत्री, बडे नेते, अधिकारी यांचा राबता मनोहरच्या मठात वाढत गेला, त्यामुळे लोकांचा विश्वासही वाढत गेला आणि गर्दी जमत गेली.

अलीकडच्या काळात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातही मनोहर भोसलेची ख्याती पोचली होती. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार हेदेखील मनोहर भोसलेचे भक्त झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in