संग्राम देशमुख भाजपची हॅट्‌ट्रीक पुर्ण करतील : धनंजय महाडिक - Make Sangram Deshmukh Jitendra Pawar victorious Dhananjay Mahadik appeal | Politics Marathi News - Sarkarnama

संग्राम देशमुख भाजपची हॅट्‌ट्रीक पुर्ण करतील : धनंजय महाडिक

शेखर जोशी 
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा," असे आवाहन माजी खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी येथे केले.

सांगली: "वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण याप्रश्‍नांवरुन राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा, धनगर समाजात असंतोष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत स्वत:ला उमेदवार समजून प्रत्येक मतदारापर्यंत जा, आणि संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा," असे आवाहन माजी खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी येथे केले.

सांगली खरे क्‍लब हाऊस येथे आज भाजपच्या वतीने पदवीधर आणि शिक्षक मतदार
संघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पदवीधर मतदार
संघातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख तर शिक्षक मतदार संघातून सोलापूरचे जितेंद्र पवार हे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.  मेळाव्यास महाडिक यांच्यासह ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार संजय पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर,आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर तसेच माजी आमदार सर्वश्री दिनकर पाटील, विलासराव जगताप, भगवान साळुंखे,राजेंद्र देशमुख, नितीन शिंदे उपस्थित होते. 

याबरोबरच शेखर चरेगावकर, बाबा देसाई, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, सुरेश आवटी, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, आरपीआयचे नेते माजी महापौर विवेक कांबळे, महापालिकेचे नेते शेखर इनामदार आदी उपस्थित होते. 

धनंजय महाडिक म्हणाले, "सध्याच्या महाविकास आघाडीच्या वर्षभराच्या काळात राज्यातील कुठलाच घटक समाधानी नाही. शेतकरी, उद्योजक नाराज आहेत. कोरोनात
लोकांचे अतोनात हाल झाले. उपचाराविना लोक रस्त्यावर मृत्यूमुखी पडले. गेल्या वर्षी महापुरानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने मदत जाहीर  केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पुढे काही झाले नाही. कर्जमाफी, वीज बीलमाफी फसवी ठरली. उलट भ्रष्टाचार वाढला. महायुती सरकारने दिलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र, या सरकारचा वकील सर्वोच् न्यायालयात हजर राहिला नाही हे दुर्दैव." 

योगेश टिळेकर म्हणाले, "संग्राम देशमुख जिल्ह्याचे भूमीपुत्र असल्याने  सांगलीकरांची जबाबदारी वाढली आहे. आम्ही पुण्यातून ताकद देतो. 2019 ला जनतेने भाजप-सेनेला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने विश्‍वासघात केला. 40वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले." 

खासदार संजय पाटील म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांनी सलग दोनवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता संग्राम देशमुख या मतदार संघातून विजय  मिळून भाजपची हॅट्‌ट्रीक पुर्ण करतील. त्यांच्या पाठिशी ताकद उभी करु.
जिल्ह्यातून त्यांना आठ ते दहा हजार मतांची आघाडी देऊ."

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, "ही निवडणूक अरुण लाड, जयंत पाटील यांच्या
विरोधात नसून ती विश्‍वासघाताच्या विरोधातील आहे. देवेंद्र फडणवीसांकडे पाहून जनतेने मतदान दिले होते. मात्र विरोधकांनी विश्‍वासघात केला.जातीयवादी पक्षांविरोधात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे."

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, "पदवीधरच्या निवडणुकीत प्रथमच रंग भरला आहे. या मतदार संघात केलेल्या सर्व्हेत भाजप 70 टक्के पुढे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांमध्ये  निर्माण केलेल्या विश्‍वासाचा हा परिणाम आहे."

धनंजय महाडिक म्हणाले, "पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा परंपरागत मतदार संघ
आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे माजी मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघाचे दोन दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर त्यांना वर संधी मिळाली. अशा लकी मतदार संघातून संग्राम देशमुख उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्‍चित आहे."

मेळाव्यास महापालिका, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख