महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना पहिल्या फेरीत १६९०६ मतांची आघाडी.. - Mahavikas Aghadi's Satish Chavan has a lead of 16906 votes in the first round | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना पहिल्या फेरीत १६९०६ मतांची आघाडी..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

प्रत्येकी ५६ हजार मतांच्या पाच फेऱ्यांमधून ही मतमोजणी पुर्ण केली जाणार आहे. पैकी पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडीने यात चांगली आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पहिल्या फेरीत केवळ १०९७३ मते मिळाली.

औरंगाबा - मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पहिल्या फेरीच्या मतमोजणी सायंकाळी सहा वाजता पुर्ण झाली. पहिल्या फेरी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८७९ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप महायुतीचे शिरीष बोराळकर यांना १० हजार ९७३ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांनी बोराळकरांवर १६ हजार ९०६ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. पोस्टल मतमोजणीत ३१४ मतांची आघाडी घेतल्यावर सतीश चव्हाण यांनी पहिल्या फेरीत देखील आपली आघाडीची घोडदौड सुरूच ठेवली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात यावेळी विक्रमी मतदान झाले. २०१४ मध्ये केवळ ३८ टक्के एवढेच मतदान झाले होते. या निवडणुकीत मात्र हे प्रमाण तब्बल ६४ टक्यांवर पोहचले होते. त्यामुळे वाढीव मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, की मग विरोधात याबद्दल उत्सूकता निर्माण झाली होती. परंतु पहिल्या फेरीतील सतीश चव्हाण यांची आघाडी पाहता मतांचा वाढलेला टक्का सतीश चव्हाण यांच्यासाठी फायद्याचा ठरतांना दिसतो आहे.

प्रत्येकी ५६ हजार मतांच्या पाच फेऱ्यांमधून ही मतमोजणी पुर्ण केली जाणार आहे. पैकी पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडीने यात चांगली आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पहिल्या फेरीत केवळ १०९७३ मते मिळाली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला दुपारी सुरूवात झाली, तेव्हा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी करण्यात आली.

यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी ६०० मते घेत ३१४ मतांची आघाडी घेतलीतर शिरीष बोराळकर यांना २८६ मते मिळालीएकूण १२४८ मतांपैकी १०७३ मते वैध ठरली आहेततर १७५ मते बाद झाली. त्यानंतर आलेल्या पहिल्या फेरीतील मतमोजणीत चव्हाण यांनी विरोधी  उमेदवार बोराळकर यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. आता पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी कायम राहते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठवाजेपासून सुरूवात झाली. चिकलठाणा एमआयडीसीतील मराठवाडा रियल्टर्स कंपनीत या मतमोजणीला सुरूवात झाली. पोस्टल मतमोजणीत पावणे दोनशे मते बाद झाली आहेत. यात प्रामुख्याने मतदारांनी मतपत्रिकेवर पसंती क्रमांक टाकण्याऐवजी मराठा आरक्षण, मोबाईल क्रमांक, स्वतःचे नाव, राईटच्या खुना केल्याचे प्रकार समोर आले आहेत. पदवीधर हे सुशिक्षत असल्यामुळे त्यांचे मतदान बाद होणे अपेक्षित नसते. परंतु हा मुद्दामहून केलेला प्रकार असल्याची चर्चा आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख