महाविकास आघाडी जिंकली, की फडणवीसांची दिल्लीला रवानगी.. - Mahavikas Aghadi won, that Fadnavis left for Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडी जिंकली, की फडणवीसांची दिल्लीला रवानगी..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

फडणवीस हे नांदेडला आले होते तेव्हा त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला बोल बच्चन सरकार म्हटलं होतं. खरतर बोलबच्चन शब्द तुम्हालाच लागू पडतो. १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन कोणी दिले होते? दोन कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन कोणी दिलं होतं? .नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचे आश्वासन कोणी दिलं होतं? मग बोलबच्चन कोण?  बोलबच्चन तुम्हीच आहात, असा पलटवार चव्हाण यांनी केला.

नांदेड ः  महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची ही पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक जिंकताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रवानगी दिल्लीत होणार असल्याचा टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या माझं काय होणार याची चिंता लागली आहे. भाजप मध्ये देखील फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस तिकडे गेले तर महाराष्ट्राचे प्रश्न तर सुटतील, शेतकरी विरोधी कायदे होणार नाहीत, धनगर,मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील सुटेल अशी उपरोधिक टिका देखील चव्हाण यांनी केली. 

महाविकास आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये आज अशोक चव्हाण, अजित पवार यांच्या उपस्थीत पदवीधर व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलतांना अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टिका केली.

चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे नांदेडला आले होते तेव्हा त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला बोल बच्चन सरकार म्हटलं होतं. खरतर बोलबच्चन शब्द तुम्हालाच लागू पडतो. १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन कोणी दिले होते? दोन कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन कोणी दिलं होतं? .नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचे आश्वासन कोणी दिलं होतं? मग बोलबच्चन कोण?  बोलबच्चन तुम्हीच आहात, असा पलटवार चव्हाण यांनी केला.

सरकार एक महिण्यात पडणार, दोन महिण्यात पडणार म्हणतं कार्यकर्ते जगवण्याचा कार्यक्रम भाजपं करत असल्याचे सांगत चव्हाण यांनी भाजप नेत्यांच्या सरकार पडणार या विधानाचा समाचार घेतला. पक्षात आलेले कार्यकर्ते यांना टिकवता आले नाहीत असा टोला लगावतांनाच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि वेगळी आहे. पहिल्यांदाच पंजा ,घड्याळ आणि धनुष्‍यबाण एकत्र आल्याने ही निवडणूक अनोखी ठरणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 

 शिवाय आपले सरकार आल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे .आता तीन पक्ष एकत्र आल्याने आपण जिंकणार आहोत, असा विश्वास देखील चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होत आहोत. दुसरी लाट येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे निश्चितपणे कोरोना सारख्या आजारावर आपण मात करून महाराष्ट्राच्या विकासाची आघाडी अशीच पुढे सुरू ठेवू, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख