महाराष्ट्रात बिहारसारखी पोलिसांची गुंडागर्दी चालणार नाही; लोणीकरांनी अधिकाऱ्याला झापले... - Maharashtra will not have police hooliganism like Bihar; Lonikar scold the officer | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रात बिहारसारखी पोलिसांची गुंडागर्दी चालणार नाही; लोणीकरांनी अधिकाऱ्याला झापले...

लक्ष्मण सोळुंके
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

पोलीसांना अशा प्रकारे कुणाच्याही घरात घुसून कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. हे प्रकरण मी विधानसभेत उचललले तर आम्ही १०५ आमदार आहोत, तुमची नोकरी जाऊ शकते, असा संतप्त इशारा देखील लोणीकरांनी दिला. चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी देखील लोणीकरांनी गौहर यांच्याकडे केली आहे.

जालना: हा महाराष्ट्र आहे, इिथे बिहार सारखी पोलीसांची गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. न्यायालयाचे आदेश नसतांना तुम्ही व्यापाऱ्यावर कारवाई कशी केली? अशा शब्दांत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकाऱ्यास झापले. या अधिकाऱ्यांने चुकीच्या माहितीवरून परतूर शहरातील एका व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती. या कारवाईने संतापलेल्या लोणीकरांनी अधिकाऱ्यास फोनवरून झापत ज्याने कुणी चुकीची माहिती दिली त्याच्यावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी केली. अन्यथा विधानसभा अधिवेशनात हे प्रकरण नेऊ, असा इशारा देखील दिला.

परतूर येथील प्रशिक्षणार्थी आयपपीएस अधिकारी हसन गौहर यांनी एका माहितीच्या आधारे परतुरमध्ये ओमप्रकाश मोर यांच्या किराणा दुकानावर धाड टाकली होती. किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.पण धाडीत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.  विशेष म्हणजे न्यायालयाचे कुठलेही आदेश नसतांना या अधिकाऱ्याने ही धाड टाकल्याचे समजताच आमदार लोणीकर यांनी हसन गौहर यांना फोन करून या चुकीच्या कारवाईबद्दल जाब विचारला.

सदर व्यापारी हे शहरातील प्रतिष्ठीत, प्रामाणिक आहेत. त्यांचे कुठेलेही अवैध धंदे नाहीत, की त्यांच्या विरोधात पोलीसांत साधी तक्रार देखील नाही. मग असे असतांना त्यांच्यावर तुम्ही कारवाई कशी केली? कुणाच्या सांगण्यावरून केली. तुमच्या एका चुकीच्या कारवाईने त्यांची इतक्या वर्षाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली, त्याला जबाबदार कोण? अशा शब्दांत लोणीकरांनी गौहर यांना जाब विचारला.

तुम्ही अजून एसपी झाला नाहीत, तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तेव्हा अशा चुकीच्या पद्धतीने कारवाई कशी करता. तुम्ही बिहारमधून आला असताल, तिथे पोलीसांची अशी गुंडागर्दी चालत असेल, पण हा महाराष्ट्र आहे, इिथे असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीसांना अशा प्रकारे कुणाच्याही घरात घुसून कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. हे प्रकरण मी विधानसभेत उचललले तर आम्ही १०५ आमदार आहोत, तुमची नोकरी जाऊ शकते, असा संतप्त इशारा देखील लोणीकरांनी दिला. चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी देखील लोणीकरांनी गौहर यांच्याकडे केली आहे.

यावर गौहर यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाली होती, त्यावरून ही कारवाई केल्याची कबुली दिली. याबद्दल आपण संबंधित व्यापाऱ्याची माफी देखील मागितली असल्याचे गौहर लोणीकरांना सांगत असल्याचे चार दिवसांपुर्वी व्हायरल झालेल्या लोणीकर आणि त्यांच्या संभाषणातील आॅडिओ क्लीपवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान या आॅडीओ क्लीपची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख