अतिरिक्त दुधापोटी ठाकरे सरकार देणार 190 कोटी

लॉकडाउनमुळे राज्यभरात दुधाच्या मागणीत घट झाली होती. यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सरकारने दुधापासून भुकटी करण्याच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे.
maharashtra state government extended milk powder scheme till 31 july
maharashtra state government extended milk powder scheme till 31 july

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुधाच्या मागणीत मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दूधाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दुधाचे रुपांतर दूध भुकटीत करण्याची योजना राबविण्यात आली होती.  तिला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

सरकारने एप्रिलपासून प्रतिदिन अतिरिक्त होणाऱ्या दुधापैकी 10 लक्ष लिटर दुधाची स्वीकृती करुन सदर दुधाचे रुपांतर दूध भुकटीत करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. सुरुवातीला ही योजना  एप्रिल व  मे  महिन्यांसाठी राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तथापी राज्यातील अतिरिक्त दुग्ध परिस्थितीत अद्यापही अपेक्षेइतकी सुधारणा झालेली नसल्याने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस १ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या वाढीव एक महिन्याच्या मुदतीत सरासरी प्रतिदिन  5.14 लक्ष लिटर या प्रमाणे 1.60 कोटी लिटर दूध स्वीकृती केली जाणार आहे. त्यासाठी 51.22 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण योजना कालावधीत एकूण ६ कोटी लिटर दूध स्विकृत केले जाणार असून त्यापोटी 190 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. 

केंद्राने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 24 मार्चपासून लॉकडाउन घेाषित केला होता. राज्यानेही 19 मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउनमध्ये बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत झालेली घट तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्ठान्न निर्मिती केंद्र मोठया प्रमाणात बंद झाल्यामुळे राज्यातील दैनंदिन दुधाची विक्री सर्वसाधारण 17 लक्ष लिटरने कमी झाली. 

कौशल्य विकास विभागाचे नाव बदलले

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे नाव आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. रोजगार व स्वयंरोजगार या विभागाचे नाव यापूर्वीच कौशल्य विकास व उद्योजकता असे करण्यात आले आहे.  मात्र, या नावात रोजगार हा शब्द आढळून न आल्याने रोजगार व स्वयंरोजगार बाबींसंदर्भात जनतेत संभ्रम निर्माण होतो. यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 

शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये

शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये एवढा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगांवचे विद्यार्थी आदीेचे जेवणांअभावी हाल होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत 30 मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दहा रुपयाऐवजी पाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. ही मुदत त्यापुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली असून 6 कोटी रुपये एवढ्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com