कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर.. . - Maharashtra Karnataka dispute simmered again ST traffic closed from both the states | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर.. .

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

दोन्ही राज्याकडून एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.  

बेळगाव : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यांच्या गाडीवरील झेंडा काढून गाडीचे नुकसान केले होते. या घटनेनंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले असून आज शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन केले. कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणारी एसटी बससेवा बंद केली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली.

काल जिल्ह्याध्यक्षांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र एसटी बसवर कर्नाटकमधील एका व्यक्तीने दगडफेक केली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.  

"बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. या प्रकरणात केंद्र सराकारने हस्तक्षेप करावा, केंद्र सरकरला पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिसतो, त्यासंबंधी ते तक्रार करतातगेल्या आठ दिवसापासून मराठी लोकांवर जे अत्याचार, दडपशाही सुरू आहे, त्याची दखल जर कोणी घेत नसेल महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीने बेळगावात उतरावे लागेल," असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 

राऊत म्हणाले, "सध्या बेळगावाला महाराष्ट्रत आणायचा की नाही ते आम्ही बघू, पण सध्या तिथल्या लोकांना संरक्षणाची गरज आहे. कन्नड वेदीकावाले मराठी माणसांवर हल्ले करीत आहेत. शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ले करीत आहेत. हा एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही, सगळ्या राजकीय पक्षाने यासाठी एकत्र येऊन या संबंधात एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवायला हवं. मी स्वतः बेळगावला जायचा प्रयत्न करतोय. मी बेळगावात जाऊ शकतो .बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचं म्हटलं की आम्हाला रोखले जाते, बंदुका दाखवतात...आमच्याकडे बंदुका नाहीत का?"

"जर कर्नाटकने कठोर पाऊल उचलयला भाग पाडले तर ती सरकारी पाऊले नसतील ती पाऊले राजकीय असतील. मग तुमची डोकं फुटली म्हणून रडत दिल्लीला जाऊ नका.. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अतिक्रमण करीत आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत काही काम करता येणार नाही. तिथे न्यायालयाचा अवमान केला जात आहे. जोपर्यंत मराठी माणसाचे डोकं फोडले जात असतील तर आमचे हात बांधलेले नाहीत. ती ताकद आमच्या हातात सुद्धा आहे. केंद्र सरकार अशा प्रकारचे वाद पेटवून भावनिक वातावरण निर्माण करून त्या राज्यात जे काही सुरू आहे, त्यांचे मंत्री ज्या प्रकरणात अडकले आहेत ते पाहून अशा प्रकारच्या हिंसक संघटनाना, दहशतवादी संघटनांना हाताशी पकडून हे वातावरण तयार केले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख