शेती आणि शेतमालासाठीही 'गोल्डन अवर' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे चांगले काम करत आहेत. परंतू त्यांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला आणखी पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे.
 chief minister udhhav thackrey
chief minister udhhav thackrey

मुंबई : महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी पिके कृषी विद्यापीठांनी विकसीत करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेतीमध्ये ही दर्जोन्नती (अपग्रेडेशन) आणि  सुधारणा (रिफॉर्म्स) खुप महत्वाची आहे. यातूनच शेतकरी स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, शेती आणि शेतमालासाठीही “गोल्डन अवर” महत्वाचा आहे. वेळेत शेतमालाची खरेदी आणि विक्री होणे गरजेचे आहे. नसता वाढीव किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांना मिळतो. 

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कृषीविद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सल्लागार अजोय मेहता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी विश्वनाथा,डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही.एम.भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ. अशोक ढवण यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे चांगले काम करत आहेत. परंतू त्यांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला आणखी पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज आहे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज आहे. शेतकऱ्यांना संघटित करताना विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे. अशा उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल याचाही विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले.

दुध कांदा, कापूस अशा वेगवेगळ्या पिकांबाबतीत असलेली अनिश्चितता संपवायची आहे यासाठी प्रत्येक पिकाचे, वाणाचे वेगळेपण ओळखून पिके घ्यावीत. त्यासाठी महाराष्ट्राची विभागवार मांडणी करून फळ, धान्य, प्रक्रिया उद्योग यांची निश्चिती करावी, त्यांचा दर्जा राखतांना आपली उत्पादने जागतिक दर्जाची आहेत का, याचा अभ्यास करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

विभागवार पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सभासद नोंदणी शासनाकडे व्हावी, त्याला चांगले बियाणे, खते देऊन बळकटी देतांना बाजारपेठेची शाश्वती देण्याचे प्रयत्न व्हावेत. उत्पादन वाढले परंतू शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न झाला पाहिजे, शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, असे ते म्हणाले.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com