leader of opposition pravin darekar injured in minor accident | Sarkarnama

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नशिराबादजवळील अपघातात जखमी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

ते दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या भालोद येथील निवासस्थानी जात असताना हा अपघात घडला.

जळगाव : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी जिल्हा दौऱ्यावर आले असता नशिराबाद टोलनाक्याजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनाला किरकोळ अपघात झाला. या अपघातात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले आहेत.

ते दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या भालोद येथील निवासस्थानी जात असताना हा अपघात घडला. विरोधी पक्षनेते फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन हे एकाच कारमधून जात होते. तर त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही कार होती. दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचा अंदाज न आल्याने दरेकर यांच्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. यावेळी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात दरेकर यांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कारची तपासणी केली. तसेच पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली.  तोपर्यंत वाहनांचा ताफा पुढे गेला होता.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर  

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (एक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार  ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.  राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख