कोकणातील नेते हायटेक..राणे बंधूंचा सर्वाधिक बोलबाला  - Konkan leader hi tech Rane brothers most active | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

कोकणातील नेते हायटेक..राणे बंधूंचा सर्वाधिक बोलबाला 

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

नेत्यांची फेसबूक पेजही आता नियमित अपडेट होत आहेत. यासाठी काहींनी स्वतंत्र यंत्रणाही उभी केली आहे. 

रत्नागिरी :  कोकणातील नेते आता फुल्ली हायटेक झाले आहेत. साधारण 2014 पासून याला सुरूवात झाली होती. कोरोना काळात यावर कळस चढला आहे. राणे बंधूंचा सोशल मिडीयावर सर्वाधिक बोलबाला आहे कोकण म्हणजे दुर्गम, समस्यांची कमतरता असलेला प्रांत. पुर्वी येथे रस्ते, पाणी याची वानवा असायची. काळ बदलला, या समस्या मागे पडल्या; मात्र आता नव्या प्रश्‍नांची भर पडली आहे. यात आघाडीवर आहे तो मोबाईल रेंज किंवा इंटरनेट उपलब्धतेचा प्रश्‍न. तरीही कोकणातील नेते हायटेक झाले आहेत. 

डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्याचा प्रयत्न आता तालुका पातळीपासून जिल्हा स्तरावर काम करणार्‍या नेत्यांकडून होत आहे. याची सुरूवात 2014 च्या निवडणुकीपासून झाली. कणकवली विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच लढणार्‍या नीतेश राणे यांनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक याचा पुरेपूर वापर करत तरूणांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यावेळी विरोधी उमेदवार प्रमोद जठार (भाजप) यांच्यावर टिका करणारा ‘पोपटपंची’ हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. 

मोदी लाट असूनही आणि मोदींची सभा होऊनही राणेंनी जठारांच्या केलेल्या पराभवात सोशल मिडीयाचा मोठा वाटा होता. पुढच्या काळात सगळ्यांनीच सोशल मिडीया वापरायचा प्रयत्न केला. यात अर्थातच नीतेश आणि नीलेश राणे या बंधूंनी कायमच आघाडी घेतली. शिवसेना मात्र या स्पर्धेत काहीशी मागे होती. तरीही गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतंत्र सोशल मिडीया विंग सुरू करून प्रचारासाठी याचा वापर केला.कोरोनामुळे पुर्णस्थितीच बदलली. आता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळेच नेते सोशल मिडीया वापरत आहेत. 

तालुका आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांची फेसबूक पेजही आता नियमित अपडेट होत आहेत. यासाठी काहींनी स्वतंत्र यंत्रणाही उभी केली आहे. कोरोना काळात आपल्याला कोरोना झाला हे जाहीर करायला बर्‍याच नेत्यांनी ट्वीटरचा वापर केला. तसा सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, माजी खासदार नीलेश राणे, संदेश पारकर, एम. के. गावडे आदींना कोरोना झाला. यातील बहुसंख्य जणांनी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर व कोरोनामुक्त झाल्यावर सोशल मिडीयावरूनच याची माहिती दिली. 

माजी खासदार नीलेश राणे ट्वीटरवरून सर्वाधिक सक्रीय असतात. शिवसेनेवर केलेल्या थेट टिकेमुळे त्यांचे ट्वीट चर्चेचा विषय ठरते. आमदार नीतेश राणे यांचे ट्वीटही अनेकदा बातमीचा विषय बनून जाते.एकूणच कोकणातील नेतेही आता हायटेक झाले आहेत. सोशल मिडीयाचा पुर्ण वापर करू लागले आहेत. पुढच्या निवडणुकांच्या प्रचारात या माध्यमाचा मुख्य रोल असेल याचे आता स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख