किसान बाग आंदोलक पोलिसांच्या ताब्यात... - Kisan Bagh Andolan of deprived Bahujan Aghadi today Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

किसान बाग आंदोलक पोलिसांच्या ताब्यात...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 जानेवारी 2021

मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

मुंबई : दिल्लीतील शाईन बागच्या धर्तीवर राज्यात किसान बाग आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत  आहे. राज्यात आज दिवसभर आंदोलन सुरू आहे. मात्र, मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

मुंबई पोलिसांनी रात्रीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली तर आज सकाळी चांदिवली येथे हे अब्दुल हसन खान यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या गाड्या तसेच पाच बस पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याच बरोबर त्यांच्या चालकांनाही पोलिसांनी अटक केली. तर शिवाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अब्दुल बारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

देवनार येथे समीर लालसरे हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील नागपाडा भागात अनेक रस्ते बंद करण्यात आले असून अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. 

मुंबईत कार्यकर्त्यांची आज सकाळपासूनच धरपकड करण्यास सुरुवात झाली आहे, तरीही कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन केले जाईल, असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकार प्रमाणेच राज्यातील आघाडी सरकार हे आडमुठेपणा करत असून त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही, असा निश्चय आघाडी सरकारने केला असल्याचे आता दिसून येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या या आघाडी सरकारचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध करण्यात येत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे  सुरेश नंदिरे यांनी सांगितले.
 

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक बिल रद्द करण्यात यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार कुठल्याही परिस्थितीत हे बिल रद्द करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. काल दिल्ली तसेच आसपासच्या परिसरात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी असल्याने कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करण्याचा निश्चय वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख