Khadse says, "I am happy to be a part of the movement."  | Sarkarnama

खडसे म्हणतात, "आंदोलनात सहभाग असल्याचा आनंद.. "  

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अयोध्येकडे जाण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले होते. त्यावेळी आम्हीही जळगाव येथून रेल्वेने कार्यकर्त्यासह अयोध्येकडे निघालो होतो. 

जळगाव : ‘मंदीर वही बनाऐंगे’, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता, पोलिसांकडून लाठीमार सुरू होतो, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात होत्या. अशाही परिस्थितीत कारसेवक पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यात आपणही होतो अशातच पोलीसांच्या एका तुकडीने आम्हाला पकडले आणि ललितपूर येथील तुरूगांत टाकले. मात्र, आज श्रीराम जन्मभूमी शिलान्यास होत असल्याने त्या आंदोलनाचे फलीत असल्याने आपल्याला आज आनंद होत आहे. अशी प्रतिक्रीया माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी आंदोलनात आपण प्रथमपासूनच सहभागी होतो. विश्‍व हिंदू परिषदेने गंगाजल पूजन आंदोलन केले होते. त्या पहिल्या आंदोलनापासून तर थेट कारसेवेपर्यंत आपण सहभागी होतो. ‘जय श्रीराम’घोषणेने त्यावेळी वातावरणच भारावलेले होते. भाजपचे नेते लालकष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे ‘चलो अयोध्या’नारा सर्वत्र घुमत होता. त्यामुळे अयोध्येकडे जाण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले होते. त्यावेळी आम्हीही जळगाव येथून रेल्वेने कार्यकर्त्यासह अयोध्येकडे निघालो होतो. 

त्यावेळी रेल्वेत कारसेवकांची प्रचंड गर्दी होती. कोणालाही बसण्यास जागा नव्हती, डब्यात ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो उभा होता. मात्र मनात एकच नारा होता ‘जय श्रीराम’! प्रत्येक स्टेशनावर गाडी थांबली कि कारसेवकांची गर्दी होत होती. आमची रेल्वे अयोध्येकडे कूच करीत असतांना गाडीत ‘मंदिर वही बनाऐंगे’ अशा घोषणा सुरूच होत्या.आता रेल्वेत केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अनेक राज्यातील कारसेवक एकत्र झाले होते. त्यांच्या उत्साह अमाप होता. अशातच रेल्वे झाशी रेल्वे स्थानकावर थांबली. त्या ठिकाणी सर्वच कारसेवक उतरू लागले काय होतेय काहीच कळत नव्हते. 

‘जय श्रीराम’घोषणा सुरूच होत्या. आम्ही रस्त्यावर उतरून चालू लागलो. त्याच वेळी पळापळ सुरू झाली. पोलिस लाठ्याकाठ्यांनी कारसेवकांना झोडपत होते अश्रुधूराच्या नळकांड्या फोडत होते. विविध राज्यातील कारसेवक एकत्र झालेले होते. त्यात केरळ येथील कारसेवकही होते. ते मात्र अधिकच आक्रमक असल्याचे दिसून आले. त्यांनी थेट पोलीसांनाच आव्हान दिल्याने पोलीस अधिकच संतप्त झाले होते. त्यांनी थेट हवेत गोळीबार सुरू केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. 

या गोधळांतच आम्ही काही कार्यकर्त्यासह अयोध्येच्या दिशेने घोषणा देत निघालो. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू होता, तरी त्या ठिकाणची सर्वसामान्य जनता मात्र आम्हाला सहकार्य करीत होते. भूक तहान विसरून आम्ही घोषणा देत अयोध्देकडे निघालेलो असतांना एके ठिकाणी पोलिसांनी आमच्या जथ्याला अटक केली. त्यांनी थेट गाडीत बसवून आम्हाला ललितपूर कारगृहात टाकले. त्या ठिकाणी आम्ही दहा दिवस होतो. आज श्रीराम मंदिरचा शिलान्यास होत असल्याने आपल्याला एक वेगळाच आनंद होत आहे. मंदीर उभारणीसाठी झालेल्या आंदोलनात आपलाही वाटा असल्याचे आपल्याला समाधान वाटत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख