Minister Ajit pawar rally in nanded news
Minister Ajit pawar rally in nanded news

खडसे, गायकवाड राष्ट्रवादीत आल्याने भाजपला सुरूंग, म्हणून त्यांचे नेते बिथरलेत...

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत त्यामुळे राज्यात सर्वत्र धुरळा उडत आहे. केंद्राकडे २८ हजार ७०० कोटी रुपयांची जीएसटीची थकबाकी आहे. आमच्या हक्काचे पैसे केंद्र सरकार महाराष्ट्राला का देत नाही , असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नांदेड : एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे भाजपमधील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत आल्याने खऱ्या अर्थाने त्या पक्षाला सुरूंग लागला आहे. भाजपमधील अनेक आमदार बिथरले आहेत, त्यांची घालमेल सुरू असल्यानेच ते कुठे जाऊ नये म्हणून भाजपचे नेते त्यांना गाजर दाखवत असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील पदवीधर व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी दोन टर्ममध्ये मराठवाड्याचे विविध प्रलंबित प्रश्न विधान परिषदेत आक्रमकपणे मांडून त्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे त्यांना विक्रमी मतांनी विजयी करून पुन्हा काम करण्याची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंग गायकवाड, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम आमदार अमरनाथ राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, शामसुंदर शिंदे ,माजी आमदार वसंतराव चव्हाण ,सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम, माजी मंत्री अर्जुन खोतकर,अनुसया खेडकर आदींची उपस्थिती होती.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अजित पवार, भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विसर पडला असल्याने भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. भाजपाचे आमदार बिथरले आहेत त्यामुळे आपल्याकडील आमदार कुठे निघून जाऊ नये त्यासाठी भाजपाची घालमेल सुरू असून भाजपातील आमदारांना गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे. भाजपातील दिग्गज नेते एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत .त्यामुळे भाजपाला आता सुरुंग लागला आहे.

विकास आघाडीचे सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येत असतील निर्णय मागेपुढे होत असतील परंतु राज्याचे हित हे आमचे समान धोरण आहे . महाराष्ट्र कधीही दिल्लीश्वरांच्या पुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही. व्यक्तिगत हेवेदावे विसरून आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी लढले पाहिजे असे, आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्यातील महामार्गांच्या कामावर होणाऱ्या दुर्लक्षावराही भाष्य केले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत त्यामुळे राज्यात सर्वत्र धुरळा उडत आहे. केंद्राकडे २८ हजार ७०० कोटी रुपयांची जीएसटीची  थकबाकी आहे. आमच्या हक्काचे पैसे केंद्र सरकार महाराष्ट्राला का देत नाही , असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

निसर्ग ,चक्रीवादळात मागच्या सरकारपेक्षा आताच्या महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत दिली आहे. परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले यात देखील आम्ही मदतीचे  पॅकेज दिले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय हक्क देण्याचे काम महाविकास आघाडीच्या सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याची जबाबदारी आता तुमची आहे असेही अजित पवार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com