कर्नाटकातही मराठा आरक्षणास धक्का

मागणीवरील अर्जाची पुनर्पडताळणी करता येत नसल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
Maratha Kranti Morchya (20).jpg
Maratha Kranti Morchya (20).jpg

बेळगाव : कर्नाटकात (Karnataka) मराठा समाजाला  (Maratha Reservation) इतर मागास वर्ग '३ बी' प्रवर्गातून '२ ए' प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने केलेली मागणी कर्नाटक राज्य इतर मागासवर्ग आयोगाने फेटाळली आहे. बंगळूर येथील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे अध्यक्ष सुरेश साठे यांनी राज्य इतर मागास वर्ग आयोगाकडे याबाबतचे निवेदन पाठविले होते. त्यावर आयोगाने  साठे यांना पत्र पाठविले असून यात ही मागणी फेटाळण्यात आली आहे.

साठे यांनी १७ जून २०१९ रोजी आयोगाला कर्नाटकातील मराठा समाजाला प्रवर्ग '३ बी' मधून '२ ए' मध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यास आयोगाने नुकतेच पत्राद्वारे उत्तर पाठविले असून यात, राज्य इतर मागास वर्ग आयोगाचे मागील अध्यक्ष शंकरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने मराठा समाजाला '२ ए' मध्ये समाविष्ट करण्यासंबंधीचे आठ सल्ले आणि सूचना असलेला अहवाल २०१२ साली कर्नाटक सरकारला पाठविला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आयोगाकडून अधिनियम १९९५ 'अ' नुसार पुन्हा त्याच मागणीवरील अर्जाची पुनर्पडताळणी करता येत नसल्याचे कारण देत हा अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा सह आंदोलने करण्यात आली होती. सध्या कर्नाटकात मराठा समाज हा ओबीसी '३ बी' मध्ये समाविष्ट आहे. कर्नाटकातील मराठा समाज हा मागासलेला असल्यामुळे समाजाला '२ ए' मध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे.

कर्नाटकात राजकीय शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे. मराठा समाजाला कर्नाटकात '२ ए ' मध्ये स्थान मिळावे. यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.

कर्नाटक सरकारनेच शंकरप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणसंबंधी समिती स्थापन केली होती. त्यानी कारवार, हल्याळ आदी मराठीबहुल भागांमध्ये पाहणी करून राज्यात मराठा समाज मागासलेला असल्याबाबत अहवाल सरकारला पाठवला होता. यात त्यांनी मराठा समाजाला '२ ए' प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी शिफारसही केली होती. परंतू २०१२ साली अहवाल सरकारला देण्यात आल्यावेळी तत्कालीन बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कोसळले. त्यामुळे हा प्रस्ताव तसाच राहिला. त्यानंतरच्या काळात त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

याबाबत बोलतांना क्षत्रिय मराठा परिषद बेळगावचे सरचिटणीस  सुधीर चव्हाण सांगितले की, मराठा समाजाला '२ ए' प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी २०१२ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात मराठा समाजाची राज्यातील आर्थिक आणि सामाजिक स्थिती कथन करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने समिती स्थापन करून पुन्हा नवा अहवाल तयार करण्याऐवजी या प्रस्तावाच्या आधारावर मराठा समाजाला '२ ए' प्रवर्गात समावेश केला पाहिजे. त्यासाठी क्षत्रिय मराठा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com