दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच : बच्चू कडू 

लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी होऊ लागली आहे.
It is impossible to start school even after Diwali: Bachchu Kadu
It is impossible to start school even after Diwali: Bachchu Kadu

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, दिवाळीनंतरही कोरोनाचे संक्रमण वाढतच राहिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्‍यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर कोरोनाविषयी राज्य सरकारने जाहीर केलेले नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता बच्चू कडू यांनी वरील अंदाज व्यक्त केला आहे. 

ते म्हणाले की, आपण ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. जर दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले, तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंदच ठेवाव्या लागणार आहेत. कदाचित आतापेक्षा कोरोनाचे संक्रमण कमी झाले आणि आपल्याला वाटले शाळा सुरू करायला हरकत नाही, तेव्हा शाळा सुरू करता येईल. परंतु आपण जगाचा विचार केला तर ब्रिटनमध्ये 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत, असेही राज्यमंत्री कडू म्हणाले. 


दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच घ्या : शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सूर 

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षा घेण्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. परीक्षेबाबत शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित एका वेबिनारमध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी दहावी-बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांना शाळांमध्येच परीक्षा केंद्र दिल्यास परीक्षा सुरळीत पार पाडता येतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. 

दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन, अभ्यासक्रम आणखी कमी करण्याची आवश्‍यकता आहे का, अशा विविध प्रश्‍नांवर या वेबिनारमध्ये चर्चा झाली. यात शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

या वेबिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे, बसंती रॉय, विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक सहभागी झाले होते. यामध्ये परीक्षा घेताना 75 टक्के अभ्यासक्रमाचे दोन भागात विभाजन करून त्यातील एका भागावर असाइनमेंट आधारित परीक्षा, तर दुसऱ्या भागावर लेखी परीक्षा घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र त्यांच्याच शाळेत देण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही, अशी सूचनाही यामध्ये मांडण्यात आली. 

एप्रिल-मेमध्ये परीक्षा घ्याव्यात! 

दर वर्षी परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येतात. यंदा त्या एप्रिल व मे महिन्यात घ्याव्यात. परीक्षा कमी वेळाची असावी, अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली. याचबरोबर विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ नये, याबाबतही चर्चा झाली. या चर्चेतून आलेल्या महत्त्वाच्या शिफारशी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे, तसेच सरकारकडे देण्यात येणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com