collage (14).jpg
collage (14).jpg

खासदार सु्प्रिया सुळे, उन्मेष पाटील यांचा कोरोना अधिवेशनात ठसा !

दोन्ही सभागृहांतील 69 पैकी 9 खासदार मात्र संपूर्ण अधिवेशनात मौनी राहिले.

नवी दिल्ली : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बसण्याची व सर्वच व्यवस्था नवीन असूनही राज्यातील बहुतांश खासदारांनी आपापले मतदारसंघ व देशापुढील प्रश्‍नांबाबत संसदेत आवाज उठवला आहे. दोन्ही सभागृहांतील 69 पैकी 9 खासदार मात्र संपूर्ण अधिवेशनात मौनी राहिले. 

भाजपचे उन्मेष पाटील हे सर्वाधिक 41 वेळा संसदेत बोलणारे खासदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सर्वाधिक 47 तर राज्यसभेत भाजपचे विनय सहस्त्रबुध्दे यांनी 39 लेखी प्रश्‍न सरकारला विचारले. संसदीय अभ्यास व संशोधन संस्थेकडून (पीआरएस) "सरकारनामा'ला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फौजिया खान यांनी पहिल्याच अधिवेशनात आपला ठसा उमटवताना राज्यसभेत सर्वाधिक 24 वेळा भाषण केले व 28 प्रश्‍न विचारले. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच हेमंत गोडसे, राजेंद्र गावीत व सदाशिव लोखंडे आदींनी (उपस्थित असल्यास) एकदाही, एकही मुद्दा किंवा लेखी प्रश्‍नही उपस्थित केला नाही. भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे विनायक राऊत या एरव्ही प्रभावी बोलणाऱ्या खासदारांनीही यावेळी चर्चेत शांत रहाणेच पसंत केल्याचे दिसते. कोरोना महामारीमुळे पावसाळी अधिवेशन एका अभूतपूर्व परिस्थितीत 14 ते 23 सप्टेंबर या काळात रोज प्रत्येकी 4 तासांच्या बैठका घेऊन पार पडले. 

कृषी विधेयकांवर राज्यसभेतील गोंधळानंतर ते वेळेआधीच गुंडाळण्यात आले. या काळात दोन्ही सभागृहे, प्रेक्षक गॅलऱ्या आदींमध्ये खासदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नवीन बैठक व ध्वनी व्यवस्था, तोंडाला मास्क, आरोग्य नियमांचे काटेकोर पालन अशा परिस्थितीत राज्यातील अनेक खासदारांनी संसदेत आवाज उठवला. प्रश्‍नोत्तराचा तास कोरोनामुळे रद्द केला गेला. मात्र, राज्यातील अनेकांनी शून्य प्रहर किंवा विधेयकांवरील चर्चा - लेखी प्रश्‍न विचारण्यात सक्रियता दाखविल्याचे दिसते. 

शून्य प्रहर व विविध विधेयकांवरील चर्चेत हे खासदार सहभागी झाले. कॉंग्रेसचे राजीव सातव यांनी राज्यसभेतील आपल्या पहिल्याच अधिवेशनात 33 प्रश्‍न विचारले. मात्र गोंधळातील निलंबित 8 खासदारांत त्यांचाही समावेश होता.

अर्थमंत्री पी चिदंबरम, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, उदयनराजे भोसले हे खासदार या अधिवेशनात दिसलेच नाहीत. यातील काहींनी पीठासीन अधिकाऱ्यांना त्याबाबत कळविले होते. प्रतापराव चिखलीकर व प्रतापराव जाधव कोरोना संक्रमण झाल्याने ते प्रत्यक्ष अधिवेशनात हजर राहू शकले नाहीत तरी जाधव यांनी 15 लेखी प्रश्‍न विचारले आहेत. याआधी मौनी खासदारांत गणना होणारे कॉंग्रेसचे कुमार केतकर यांनी यावेळी 4 प्रश्‍न विचारले. शून्य प्रहरात त्यांनी मांडलेल्या गुजरातच्या मच्छिमारांच्या एकमेव मुद्याची दखल घेऊन सभापती वेंकय्या नायडू यांनी सरकारला त्याबाबत निर्देश दिले. 

राज्यातील मौनी खासदार (यातील काहीजण अनुपस्थित असण्याची शक्‍यता)
 नारायण राणे, पूनम महाजन, विनायक राऊत, उदयनराजे भोसले, हेमंत गोडसे, बाळू धानोरकर, राजेंद्र गावीत, सदाशिव लोखंडे, संजय मंडलीक. शून्य प्रहर- चर्चेत सर्वाधिक मुद्दे मांडणारे ः उन्मेष पाटील (41), सुजय विखे पाटील (28), फौजिया खान ( 24), राजीव सातव (18), रक्षा खडसे (17), श्रीरंग बारणे (16), सुप्रिया सुळे (13), प्रियांका चतुर्वेदी (11). सर्वाधिक लेखी प्रश्‍न विचारणारे ः सुप्रिया सुळे (47), उन्मेष पाटील, सुजय विखे, श्रीरंग बारणे (प्रत्येकी 40), सातव (33), फौजिया खान (28), इम्तियाज जलील (23), चतुर्वेदी (20).

Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com