गडचिरोली : नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरतीताई हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. या वेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृहमंत्री येत असल्याने पोलीसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलीसांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत फराळ केला.
नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्या घरांना भेटी दिल्या. कुटुंबियांशी संवाद साधत लहान मुलांसमवेत गप्पा गोष्टी केल्या या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
देशमुख म्हणाले, "भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापसून, आपल्या आई-वडीलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलिस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरा करत बसलो असतो तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा."
गडचिरोली पोलीस क्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील म्हणाले की या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. गृह मंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. पोलीसांच्या इतर अडचणी समूजन घेतल्या. त्या त्वरित सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. सरकार सदैव पोलीस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.
एनडीएची आज पाटण्यात बैठक#NDA #Bihar #BJP #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/qcHtZTq8P2
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 15, 2020
पोलीस कर्मचारी भारावून गेले
गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख दांपत्यांने आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून तीनशे किलोमीटर अंतरावर छत्तीसगढ सीमेलगत इंद्रावती नदीकाठी पातागुडम पोलीस चौकी आहे. देशातील सर्वात दुर्गम चौकी मानली जाते.

