हाथरस खटला उत्तरप्रदेशच्या बाहेर चालवावा.. - Hathras case should be tried outside Uttar Pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरस खटला उत्तरप्रदेशच्या बाहेर चालवावा..

अरुण जोशी
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

हाथरस  खटला हा उत्तरप्रदेश मध्ये न चालवता तो बाहेरच्या राज्यात चालवावा, अशी मागणी  यशोमती ठाकूर यांनी केली.

अमरावती : सध्या देशभरात उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिवाय, उत्तरप्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून टीका होत आहे. हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा खटला हा उत्तरप्रदेश मध्ये न चालवता तो बाहेरच्या राज्यात चालवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँगेसच्या उपाध्यक्षा व राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी आज केली.

सुप्रीम कोर्टाने राजधर्माचे पालन या ठिकाणी करायला पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. ज्या ठिकाणी हि घटना घडली त्या ठिकाणचे पुरावे नष्ट होऊ शकतात तर पीडित परिवाराचे सदस्य हि जिवंत राहिले पाहिजे असे हि महिला व बाल कल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पीडितेच्या आईनंदेखील आपली व्यथा मांडली आहे. 

“शेवटीदेखील आम्हाला आमच्या मुलीचा चेहरादेखील पाहू दिला नाही,” असं पीडितेच्या आईनं सांगितलं आहे. तर, या अगोदर हाथरस घटनेवर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे,” असं  म्हटलं होतं.

उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींना कठोर शासन करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या धक्कादायक प्रकरणानंतर यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर चौबाजूने हल्लाबोल होत आहे. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्‌विट करून या प्रकरणाचा निषेध करतानाच योगी सरकारला आरोपीच्या पिंजण्यात उभे केले आहे. पिडितीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर अंत्यसंस्कार रात्रीच का आटपून घेतले हा प्रश्‍नही केला आहे. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार पिडितीच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

हे सर्व असले तरी हाथरस प्रकरणाने निर्भयाप्रकरणाची आठवण देशाला करून दिली. ज्या दलित मुलीवर अत्याचार झाले ते निदर्यपणे केले होते. बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशाला हादरा बसला आहे. पिडितेच्या वडलांनी डोळ्यातून अश्रू गाळत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले, की नातेवाईक सोडा आमच्या लेकराजवळ आम्हालाही जावू दिले. तिचा चेहराही नीट पाहता आला नाही. सकाळी अंत्यसंस्कार करू या अशी हातजोडून मी मागणी करीत होतो पण, पोलिसांनी ऐकले नाही. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचा मृतदेह पोलिस घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख